Pune Gramin : पुणे जिल्ह्यात पावसाचे तीन बळी; दौंड, भामा आसखेड धरणाजवळ घटना

दौंड / बारामती : जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडविला आहे. गेल्या २४ तासांत पावसाचा कहर सुरूच असून तीन जणांचा बळी गेला आहे. यात सर्वाधिक फटका हा बारामती, दौंड तालुक्याला बसला आहे. पावसाने कर्वेनगर, दौंड आणि खेड तालुक्यातील प्रत्येकी एक असे तिघांचे बळी गेले आहेत. दरम्यान, प्रशासन सकाळपासून पंचनाम्याच्या कामात व्यस्त झाले होते.
पावसाने दौंड तालुक्यात ज्येष्ठ महिलेचा बळी घेतला. शहरातील एका जुन्या बांधकामाची भिंत पावसामुळे कोसळली. यामध्ये त्या दुकानात उभ्या असताना त्यांच्या अंगावर ही भिंत कोसळून जखमी झाल्या. त्यांना खासगी रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ताराबाई विश्वचंद आहेर (वय ७५), असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे.
दुसऱ्या घटनेत भामा आसखेड धरणाच्या कडेला मासेमारी करणाऱ्या युवकाच्या अंगावर सोमवार (दि. २६) दुपारी वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. संतोष गुलाब खांडवे (वय २७, रा. ठाकरवाडी, वेताळे, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून शेतीचे प्रचंड नुकसान आणि घरांची पडझड झाली आहे.
तरकारी पिके, ऊस, भाजीपाला, फळबागा, चारा पिकांना असून, मुसळधार बरसणाऱ्या सरींनी तारांबळ उडवून दिली आहे. ठिकठिकाणी वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी घुसले असून, नागरिकांना बेघर व्हावे लागले आहे. कोकण, गोव्यात पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तसेच विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
ठाणे, मुंबई आणि रायगड येथे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहेच; याशिवाय सिंधुदुर्ग येथे मंगळवारी (दि. २७) आणि रत्नागिरी येथे येत्या ४८ तासांत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला असून, या जिल्ह्यांना पुढील दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे, तसेच धोक्याची सूचनाही देण्यात आली आहे.
पुणे आणि सातारा जिल्हा तसेच त्यांचा घाट विभाग येथे पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी वेधशाळेने रेड अलर्ट दिला आहे. कोल्हापूर, सातारा येथे आणि त्याच्या घाटविभागात मंगळवारी (दि. २७ मे) रेड अलर्ट देण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे पुढील तीन ते चार दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथे पुढील दोन ते तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सांगली, सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिव येथे पावसाला सुरुवात झाली आहे.
झाड अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू
कर्वेनगर भागात झाड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. राहुल नरहर जोशी (वय ४९, रा. नन्हे, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. जोशी हे सोमवारी सायंकाळी दुचाकीवरून कर्वेनगर भागातून घरी निघाले होते. अलंकार पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या झाडाची फांदी दुचाकीस्वार जोशी यांच्या अंगावर कोसळली.
अपघातात ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या जोशी यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.
रस्त्यात पडलेल्या फांद्या हटवून जवानांनी रस्ता वाहतुकीस मोकळा केला. या वेळी कर्वेनगर परिसरातील रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.





