Pune District :मंचर-घोडेगाव रस्त्यावरील अपघातात तिघांचा मृत्यू

मंचर – आंबेगाव तालुक्यातील मंचर-घोडेगाव रस्त्यावर पळस्टीका फाटा येथे स्कुटी आणि आराम बस यांची धडक होऊन झालेल्या अपघातात स्कुटीवरील तीन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, दि. १५ रोजी दुपारी झाली. मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी तिघांना आणले असता तिघांचाही मृत्यू उपचारापूर्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
उत्तर प्रदेश पासिंगची खासगी प्रवासी बस ही भीमाशंकरच्या दिशेने जात होती.त्यावेळी स्कुटी घोडेगाववरून मंचरच्या दिशेने येत असताना घोडेगाव शहराजवळ असणाऱ्या पळस्टीका फाट्यावर बस व स्कुटीची धडक झाली. धडकेनंतर खाजगी बसने स्कुटीला काही अंतर फरफटत नेले असून स्कुटीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.अपघात झाल्यानंतर मंचर येथील देवेंद्रशेठ शहा फाउंडेशन आणि घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या खाजगी रुग्णवाहिकेतून तीन युवकांना गंभीर जखमी अवस्थेत मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी आणण्यात आले.
त्यावेळी तिघांचाही मृत्यू उपचारापूर्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भीषण अपघातात स्कुटीवरून प्रवास करणारे कोळवाडी गावातील अथर्व संदीप खमसे (वय १८), गणेश रामभाऊ असवले (वय १८), भारत सुदाम वाजे (वय १८) या तीन युवकांचा मृत्यू झाल्याचे मंचर पोलिसांनी सांगितले.
मंचर उपजिल्हा रुग्णालयात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील,देवेंद्रशेठ शहा फाउंडेशनचे अध्यक्ष निळूभाऊ काळे यांनी भेट देवून मयतांच्या नातेवाईकांचे सात्वन केले. घोडेगाव पोलिसांनी अपघातस्थळी भेट देवून पंचनामा केला आहे.अपघाताचा तपास घोडेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू असल्याचे सांगण्यात आले.अपघाताचे नेमके कारण समजले नाही.





