Baramati Crime News : तरुणावर कोयत्याने वार करून लुटणाऱ्या तिघांना बेड्या; बारामती तालुका पोलिसांची कारवाई
Baramati Crime News : एलसी कंपनी लेक परिसरात तरुणावर कोयत्याने वार करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.

बारामती : बारामतीतील तांदुळवाडी येथे एलसी कंपनी लेक परिसरात तरुणावर कोयत्याने वार करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींकडून ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि.२६ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास तांदुळवाडी विमानतळ रोडलगत असलेल्या एलसी कंपनी लेक येथील मोकळ्या जागेत फिर्यादी संतोष रायनवार (बदलेले नाव) (मूळ राहणार नागपूर वय २६, हल्ली बारामती) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत बसले होते. त्यावेळी तोंडाला मास्क व रुमाल बांधलेल्या तिघा इसमांनी त्यांच्या जवळ येत लोखंडी सत्तूर, कोयत्याचा धाक दाखवून पैशांची मागणी केली.
विरोध केल्यावर एका आरोपीने फिर्यादीच्या डाव्या पायावर वार करून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी सोन्याची सुमारे २१ ग्रॅम वजनाची चैन (किंमत ३ लाख रुपये), चांदीची अंगठी (५ हजार रुपये), चांदीची चैन (१५ हजार रुपये), आणखी एक चांदीची अंगठी (२ हजार रुपये) व २ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला व ‘परत इकडे यायचं नाही’ अशी धमकी देत तेथून पसार झाले.
याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात येथे बी.एन.एस कलम ३०९(६),३(५) अन्वये दाखल करण्यात आला आहे. गोपनीय माहितीवरून तपासादरम्यान प्रसाद गणपत भोसले वय २४ धैर्यशील प्रशांत आगवणे वय १९ व कृष्णा नाना गाडेकर वय २१ (सर्व रा. तांदुळवाडी, ता.बारामती) यांना २८ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली.
न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ भारत खारतोडे मनोज पवार जितेंद्र शिंदे राजू बन्ने व पथकाने केली.





