Pune Crime : अपहरण करून खंडणी उकळणारे तीन आरोपी अटकेत, विधीसंघर्षित मुलगी ताब्यात

पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पथकाने अपहरण, मारहाण आणि गंभीर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आले असून विधीसंघर्षित मुलीस ताब्यात घेण्यात आले आहे.
अक्षय गंगाधर बुधेवार ( २२, रा. गोकळनगर, कात्रज) , अमोल अंकश शिंदे ( २८, रा. कर्वेनगर, कोथरूड,) आणि राहुल तानाजी शितोळे ( २३, रा. लंबोदर अपार्टमेंट, शेलार मळा, कात्रज) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तसेच या गुन्ह्यातील विधीसंघर्षित मुलीसही ताब्यात घेण्यात आले आहे.
फिर्यादी प्रकाश दिनकर जोरी ( २८, भुगाव ) याला ०७ डिसेंबर रोजी रात्री कात्रज चौकात समाज माध्यमातील ओळखीच्या मुलीने बोलावून घेतले होते. त्यानंतर ती त्याला सोबत घेऊन कात्रज घाटाकडे गेली. तेथे तिचे साथीदार असलेल्या आरोपींनी फिर्यादीला अडवून जबरदस्तीने येवलेवाडी येथे नेले व तिथे अक्षय शेलार आणि त्याचे दोन साथीदारही आले.
सर्व आरोपींनी मिळून फिर्यादीला शिवीगाळ, मारहाण करत त्यांच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. हा खोटा गुन्हा दाखल करू नये म्हणून त्यांनी ७० हजार रुपये खंडणीची मागणी केली. त्यापैकी १० हजार रोख रक्कम जबरदस्तीने घेतली व उर्वरित रकमेसाठी सतत फोन कॉल करून दबाव टाकला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार हे आरोपींचा शोध घेत होते. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपींना कात्रज परिसरातून बुधवारी रात्री अटक केली.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त मिलिंद मोहीते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सपोनि स्नेहल थोरात, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, तसेच नागेश पिसाळ, महेश बारवकर, मंगेश पवार, नयनाथ खताळ, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, किरण साबळे, मितेश चोरमोले, संदीप आगळे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांच्या पथकाने केली.
पोलीसांनी आवाहन केले आहे की, अशा प्रकारची फसवणूक किंवा खंडणीची घटना कोणासोबत घडली असल्यास त्यांनी त्वरित पोलीस ठाण्यात कळवावे. यातील आरोपींवर सासवड पोलीस ठाण्यात असा एक गुन्हा दाखल आहे.




