पुणे जिल्हा | तुमच्यासाठी पवार साहेबांना धोका दिला, पण आम्हाला काय मिळाले?

बारामती, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या नावाने लिहिलेले एक पत्र व्हायरल झाले होते. आता विधानसभेच्या तोंडावर पुन्हा तसेच एक पत्र बारामतीत व्हायरल झाले आहे.
हे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका कार्यकर्त्याने लिहिल्याचा दावा असून, त्यात दादांवर कुणाच्या तरी दबावाखाली भावनिक कार्ड खेळण्याचा आरोप करण्यात आला आहे. आम्ही तुमच्यासाठी पवार साहेबांना धोका दिला, पण आम्हाला काय मिळाले? असा सवालही या पत्रात अजित पवारांना विचारण्यात आला आहे.
या निनावी पत्रात अजित पवारांचा स्वभाव सध्या बदलल्याचाही दावा करण्यात आला आहे. दादा, आजकाल तुमचं वागणं, बोलणं आणि ऐकणंसुद्धा बदललं आहे. तुम्ही खदखद व्यक्त करताय, मन मोकळं करताय की भावनिक कार्ड खेळताय हेच समजत नाही. तुमच्या भाषणातला रांगडेपणा, स्पष्टपणा, रोखठोक आणि लढावू बाणा हरवला आहे की काय? असा सवाल करण्यात आला आहे





