Indrajeet Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

कोल्हापूर : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. प्रशांत कोरटकर या नावाच्या व्यक्तीने इंद्रजीत सावंत यांना फोन करून धमकी दिली होती. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची दखल घेत पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांकडून कारवाईला सुरूवात असून इंद्रजीत सावंत यांचा जबाब नोंदवला आहे. पोलीस आज त्यांच्या घरी आले होते. तसेच पोलिसांनी धमकीचं कॉल रेकॉर्डिंग देखील ऐकलं आहे.
याबाबत बोलताना इंद्रजीत सावंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि मराठा समाज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान या कोरटकर नावाच्या व्यक्तीने केले होते. याबाबत माझ्या फोनमधील रेकॉर्डिंग मी पोलिसांना दिले आहेत. तसेच इन्टाग्रामवर देखील या व्यक्तीने माझ्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. याद्वारे त्याने जातीजातीत तेढ निर्माण होणारे विधान केले आहेत. तसेच शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांबाबत अपमानजनक वक्तव्य केल्याने या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा म्हणून मी आत्ता पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे.
पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांची आणि मराठ्यांची अस्मिता माझ्यासाठी महत्वाची असून याविरोधातच मी फक्त तक्रार दिली आहे. यानंतर कोरटकर नावाच्या या व्यक्तीवर नुसता गुन्हा दाखल करुन उपयोग नाही तर त्याच्यावर कारवाई देखील झाली पाहिजे. कारण महाराष्ट्रात शिवाजी महाराजांबाबत गेल्या तीन-चार वर्षापासून विविध विधाने येत आहेत. त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. त्यामुळे अशा निर्लज्ज माणसांची महाराष्ट्रात राहुन, खालच्या पातळीवर जाऊन बोलण्याची काही जणांची हिंमत झाली आहे. त्यामुळे सरकारने यावर तातडीने कडक कारवाई केली पाहिजे असे इंद्रजीत सावंत म्हणाले.





