अंथरुणाला खिळलेल्यांचे लसीकरण होईना

पुणे- अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांना घरी जाऊन करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी 65 अर्ज आले; परंतु त्यातील 50 अर्ज अपूर्ण असून महापालिकेने त्यांना पुन्हा “कॉन्टॅक्ट’ केला आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार अंथरूणाला खिळून असलेल्या रुग्णांना करोना प्रतिबंधक लसीचे डोस घरी जाऊन देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने [email protected] हा ई-मेल ऍड्रेस सुरू केला आहे. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी किंवा रुग्णांनी अर्ज पाठवायचा आहे. अर्ज दाखल करताना काही कागदपत्रेही जोडण्याचे बंधन आहे.
त्यामध्ये व्यक्तीचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरूणाला खिळून असण्याचे कारण, संबंधित व्यक्तीचे सहमती पत्र, वैद्यकीय तज्ज्ञांचे प्रमाणपत्र, जवळच्या व्यक्तीचे सहमतीपत्र या सगळ्या कागदपत्रांचा समावेश आहे. याशिवाय लस देतेवेळी त्यांच्या फॅमिली डॉक्टरची उपस्थितीही आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सांगितलेली सगळी कागदपत्रे दाखल केल्यानंतर आणि त्याची पडताळणी झाल्यानंतर संबंधितांना लसीकरणाची तारीख आणि वेळ कळवण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जे अर्ज येतील त्यातून विभागवार नियोजन करण्यात येणार आहे.





