देशातील विरोधक एकत्र येण्याची ही सुरूवात – छगन भुजबळ

नाशिक – भाजप विरोधात हळूहळू सर्वच पक्ष एकत्र राहावेत याकरीता हालचाली सुरू झाल्या आहेत. दक्षिण भारतातील मंडळींकडूनही निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर हालचाली सुरू आहेत. देशातील हुकुमशाही विरोधात सर्व पक्ष एकत्र येणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ठाकरे केजरीवाल यांच्या भेटीनंतर व्यक्त केली.
नाशिकमध्ये माध्यमांशी भुजबळ यांनी संवाद साधला. नुकतीच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट झाली. त्यामुळे शिवसेना-आप युती होणार का ? याबाबत राजकीय वर्तूळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
या भेटीबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले, भाजप विरुद्ध सगळ्यांनी एकत्र राहावे म्हणून हळूहळू हालचाली चालू आहेत. वर्षभरात निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे हालचालींना प्रारंभ झाला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि धनुष्यबाण निवडणूक आयोगाने काढून घेतले असले, तरी जनता शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनाच मानते.
लोकसभा निवडणूकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असतील तर चांगलेच आहे. कारण महागाईचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, नोटबंदी विरोधी बोलणाऱ्यांवर कारवाई असेल या सगळ्या गोष्टींचा मारा होत आहे. तसेच सरकारविरोधात बोलल्यास विरोधी नेत्यांना थेट तुरुंगात डांबले जात आहे. लोकशाहीवर प्रेम आहे, त्यांना असे आवडत नाही, त्यामुळे लहान लहान पक्ष देखील भाजप विरोधात एकत्र येण्याचा प्रयत्न करत असल्याचे भुजबळ म्हणाले.





