ब्रिस्बेन – गेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील गाबा येथील मैदानावर भारताने ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांच्या दमदार खेळाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केले होते. मात्र, त्यावेळी झालेल्या पराभवावर बोलण्याची ही वेळ नाही. त्याऐवजी आमचा संघ ऍडलेडप्रमाणेच दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शने बोलताना सांगितले. ऑस्ट्रेलियाचा संघ गाबावर नेहमीच दमदार कामगिरी करत आला आहे. १९८८ नंतर प्रथमच भारताने ऑस्ट्रेलियाला २०२१ साली गाबावर पराभूत केले होते. सध्या सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेचा तिसरा सामना गाबावर होणार आहे. त्यामुळेच भारत आपल्या २०२१ च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी निश्चितच इच्छूक असणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ब्रिस्बेन येथे पोहचला असून, त्यांनी सरावाला देखील सुरुवात केली आहे. सरावानंतर माध्यमांशी बोलताना याच संदर्भात मार्श म्हणाला की, भूतकाळात काय घडले याचा विचार करण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. सध्या आपण फक्त वर्तमानात महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहोत. पर्थमधील पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर आम्ही ज्या प्रकारे पुनरागमन केले, त्याचे हे चांगले उदाहरण आहे. त्यामुळे या आठवड्यात आम्ही आमच्या शैलीतील क्रिकेट खेळण्यावर निश्चितच भर देत आहोत. IND vs AUS 3rd Test : ब्रिस्बेन कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार बदल? ‘या’ दोन खेळाडूंना मिळणार डच्चू…. मार्शने पहिल्या दोन सामन्यांमध्ये फारशी गोलंदाजी केली नव्हती. मात्र, हा संघाच्या रणनीतीचा भाग असल्याचे त्याने सांगितले, तो म्हणाला, माझया पाठीत दुखत होते, मात्र आता मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी आमची रणनीती स्पष्ट होती. मी आतापर्यंत मला आवडेल तितकी गोलंदाजी केलेली नाही. मात्र आमचे वैद्यकीय कर्मचारी प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड, कर्णधार पॅट कमिन्स माझ्या भूमिकेबद्दल स्पष्ट आहेत.