Mitchell Marsh : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मार्शचा धमाका! कर्णधारपदाची जबाबदारी मिळताच ठोकले वादळी शतक

Mitchell Marsh century in BBL 2025-26 : क्रिकेट चाहत्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत धमाकेदार झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा टी-२० कर्णधार मिचेल मार्शने बिग बॅश लीग (BBL) २०२५-२६ मध्ये होबार्ट हरिकेन्सविरुद्ध खेळताना एक अविस्मरणीय शतक झळकावले आहे. विशेष म्हणजे, टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार म्हणून घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच मार्शने ही तुफानी खेळी केली.
मार्शने पाडला धावांचा पाऊस –
१ जानेवारी २०२६ रोजी होबार्टच्या बेलरिव ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात होबार्ट हरिकेन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, पर्थ स्कॉर्चर्सकडून सलामीला आलेल्या मिचेल मार्शने हा निर्णय चुकीचा ठरवला. मार्शने अवघ्या ५८ चेंडूत १०२ धावांची स्फोटक खेळी साकारली.
Enjoy all the highlights from Mitch Marsh’s fantastic century! 💯 #BBL15 pic.twitter.com/ZhghKah0Sd
— KFC Big Bash League (@BBL) January 1, 2026
मार्शच्या खेळीची वैशिष्ट्ये म्हणजे त्याने ११ चौकार आणि पाच गगनचुंबी षटकार ठोकले. यासह मार्शने अवघ्या ५५ चेंडूंत १७५.८६ च्या स्ट्राईक रेटने बीबीएल कारकिर्दीतील दुसरे शतक ठरले. मिचेल मार्श १९ व्या षटकात नॅथन एलिसच्या चेंडूवर झेलबाद झाला, पण तोपर्यंत त्याने संघाला भक्कम स्थितीत पोहोचवले होते.
हेही वाचा – Sports Event 2026 : टी-२० वर्ल्ड कपपासून ते फुटबॉल महाकुंभापर्यंत; क्रीडा प्रेमींसाठी ‘सुपर’ ठरणार हे वर्ष!
कर्णधारपदाचा दबाव नाही, तर उत्साह!
दिवसाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाने फेब्रुवारी २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठी आपला तात्पुरता (Provisional) संघ जाहीर केला होता. या संघाचे नेतृत्व मिचेल मार्शकडे सोपवण्यात आले आहे. कर्णधारपदाची अधिकृत मोहोर उमटल्यानंतर मार्शने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यावरून तो आगामी विश्वचषकासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एरॉन हार्डीचे थोडक्यात हुकले शतक –
पर्थ स्कॉर्चर्सला २२९ धावांच्या महाकाय धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात एरॉन हार्डीनेही मोलाचा वाटा उचलला. हार्डीने ४३ चेंडूत नाबाद ९४ धावांची खेळी केली. यात ९ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. दुर्दैवाने त्याचे शतक अवघ्या ६ धावांनी हुकले, मात्र मार्श आणि हार्डीच्या जोडीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली.
हेही वाचा – Jasprit Bumrah : बुमराहचा ऐतिहासिक पराक्रम! सलग दोन वर्षे ‘या’ बाबतीत नंबर-1 राहणारा पहिला भारतीय गोलंदाज
मार्शचा हा फॉर्म ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी शुभसंकेत मानला जात असून, आगामी टी-२० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असणार हे निश्चित झाले आहे.





