हा महाराजांचा अपमान.! नाना पटोलेंचा गंभीर आरोप; म्हणाले, ‘पुतळ्याच्या डोक्यात कागद आणि कापड भरलं’

Chhatrapati Shivaji Maharaj statue collapsed । Nana Patole: सिंधुदुर्गातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.
मात्र आता या प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पहिली कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरोधकांकडून जयदीप आपटेला काम कसे मिळाले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अश्यातच आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केला आहे. ‘छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं जे डोकं होतं त्यात या शिल्पकाराने कागद आणि कापड भरलं होतं,’ असं नाना पटोले म्हणाले आहेत.
घडलेल्या प्रकरणावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, “अशी माहितीही समोर येते आहे की छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं जे डोकं होतं त्यात या शिल्पकाराने कागद आणि कापड भरलं होतं, ही बाबही निदर्शनाला आली आहे. पेशवाईच्या काळात जसा छत्रपती शिवरायांचा अपमान केला जात होता तसाच लोकशाही माध्यमातून आलेल्या सरकारचा अपमान केला.
असंवैधिनिक सरकारने जाणूनबुजून महाराजांचा अपमान केला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून पुतळा उभारला गेला, त्यानंतर आठ महिन्यांताच पुतळा पडला. याचं मुख्य कारण फक्त आर्किटेक्ट नाही किंवा मूर्तीकार नाही पण आमचं हे म्हणणं आहे की केंद्र आणि राज्य सरकारची ही चूक आहे” असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले, “आपल्याला माहीतच आहे की शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने घाई केली. ही बाब आता निदर्शनाला येते आहेच. सांस्कृतिक संचलनालयाकडून पुतळा प्रमाणित करायला हवा होता तो केला गेला नाही.
शिल्पकार जयदीप आपटेला अनुभव नव्हता, अनुभव नसणाऱ्या व्यक्तीला हा पुतळा बनवण्याचं काम देण्यात आलं. शिल्पकार जयदीप आपटे तो संघाचा माणूस आहे. आरएसएसच्या माणसाला काम देण्याचं कारण काय? असं नाना पटोले म्हणाले.”
पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते पुतळ्याचे अनावरण:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 35 पुतळी फुट्याचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या आठ महिन्यांत हा पुतळा कोसळल्याने त्याची बांधणी निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे.
या पुतळ्याला काही दिवसांपूर्वी गंज लागला होता. ही बाब लक्षात येताच सार्वजनिक बांधकाम खात्याने पत्र लिहून ही गोष्ट नौदलाला कळवली होती. मात्र, त्यानंतर नौदलाकडून योग्य ती कार्यवाही झाली नाही आणि शिवाजी महाराजांचा हा पुतळा मुळापासून कोसळण्याचा दुर्दैवी प्रकार घडला.
महाराजांचा पुतळा उभारणारा ‘जयदीप आपटे’ नेमका कोण? वाचा…..
सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणारा ‘जयदीप आपटे’ नेमका कोण?





