Ramdas Kadam : “ते कुणाच्याही कायमचे…”; रामदास कदमांचा सुनील तटकरेंवर बोचरा वार, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam : अशातच आता कोकणातील शिवसेना शिंदे गटाच्या एका बड्या नेत्याने सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Ramdas Kadam criticizes Sunil Tatkare : राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. भेटीगाठी वाढल्या असून भेटीचे केंद्रबिंदू वर्षा आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
या भेटीचा नेमका तपशील समोर आलेला नाही. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटीविषयी जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी आपापली भूमिका स्पष्ट केली आहे. अशातच आता कोकणातील शिवसेना शिंदे गटाचे एका बड्या नेत्याने सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“तटकरे यांच्या बाबतीत काहीही होऊ शकते, ते कुणाच्याही कायमचे होऊ शकत नाहीत, अशी बोचरी टीका शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केली आहे. “सुनील तटकरे जिथे जेवेल तिथेच छेद करेल, ही तटकरेची अवलाद आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत न बोललेलेच बरे.” अशा अत्यंत खोचक शब्दांत रामदास कदम यांनी सुनील तटकरेंवर बोचरा वार केला. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी-शिवसेनेत जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उसनं अवसान आणण्याचा प्रयत्न
रत्नागिरीतील मंडणगड येथे ते माध्यमांशी बोलत होते. “लोक आता दूधखुळे राहिलेले नाहीत. सर्व गोष्टी जनतेला समजतात. आपण अजूनही राजकारणात आहोत, हे दाखवण्यासाठी उसनं अवसान आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, हे सर्व लोकांच्या लक्षात येत आहे.” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर रामदास कदम यांनी टीका केली.
मी त्यांना जवळून ओळखतो.
विरोधी पक्षातील आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणे ही सामान्य बाब असून, मतदारसंघातील किंवा इतर विकासकामांसाठी कोणताही आमदार मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो, असे म्हणत “जयंत पाटील माझे जवळचे मित्र आहेत. मी त्यांना जवळून ओळखतो. त्यांच्या भेटीमागे संशय घेणे किंवा त्यांच्यावर कुठलाही डाग लागेल असे बोलणे योग्य नाही.” अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी जयंत पाटील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर दिली.
पार्थ पवारही ‘वर्षा’वर
भेटीगाठींचा सिलिसिला सुरू असून आता पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबतच्या चर्चांनाही पुन्हा वेग आला आहे.
Strait Of Hormuz: “पुढील आदेशापर्यंत…” ; DGMA कडून होर्मुझमधील भारतीयांसाठी सूचना जारी






