Amol Mitkari : ‘सुनेत्रा पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न’; मिटकरींचा खळबळजनक आरोप
माजी आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राष्ट्रवादीत काहीही आलबेल नसल्याचे मान्य केले आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री दत्तात्रय भरणे यांनीच याला दुजोरा दिला आहे.

Amol Mitkari : दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी पक्षाचे वरिष्ठ नेते सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला आक्षेप घेत कायदेशीर नोटीस बजावली होती. त्यानंतर, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, या भेटीबाबत सुनेत्रा पवार यांना काहीच माहिती नसल्याचे समोर आले आहे.
त्यावरुन, माजी आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राष्ट्रवादीत काहीही आलबेल नसल्याचे मान्य केले आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री दत्तात्रय भरणे यांनीच याला दुजोरा दिला आहे. भरणे यांच्या वक्तव्यानंतर मिटकरी यांनी ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे.
पक्ष नेतृत्वाला न विचारता नेमके कोणती चर्चा करण्यात आली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पक्षातील काही नेते जाणीवपूर्वक सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी (Amol Mitkari) केला.
मात्र, त्यांनी कुठल्याही नेत्याचे थेट नाव घेतलेले नाही. पक्षातील याच लोकांनी सच्चिदानंद सिंह यांना ताकद दिली आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना त्रास देणारे नेते कोण आहेत याचा शोध पक्षाचे कार्यकर्ते घेतील. पक्षाचे तळागाळातील कार्यकर्ते अशा नेत्यांना तळागाळात गाडतील. आमच्या पक्षातील कोणत्याही नेत्यांशी भेटण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आमच्या पक्ष नेतृत्वाशी चर्चा करावी, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.
तसेच, मंत्री दत्तात्रय भरणे हे आपण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर अनेकवेळा फोन केल्यानंतरही त्यांनी उत्तर दिले नाही. भरणे यांना इतर पक्षाच्या नेत्यांचे फोन उचलायला वेळ आहे. आपला फोन घेत नसून भाजप आमदारांसाठी तत्परता दाखवत असल्याचेही मिटकरी (Amol Mitkari) यांनी आरोप केला आहे.






