Thergaon Murder Case : थेरगावमध्ये रक्तरंजित थरार! प्रेमप्रकरणातून १९ वर्षीय तरुणाची चॉपरने वार करून हत्या
Thergaon Murder Case : तरुणीच्या आईचा प्रेमसंबंधाला होता विरोध; आईच्या मित्राने साथीदारासह मिळून सुभान शेखवर केला जीवघेणा हल्ला.

Thergaon Murder Case – थेरगाव परिसरात शुक्रवारी (दि. ७ मे) रोजी रात्री एका १९ वर्षीय तरुणाची प्रेमप्रकरणाच्या रागातून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तरुणावर आणि त्याच्या चुलत भावावर चाकू व चॉपरने हल्ला केली, यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी आहे. सुभान हमीद शेख (वय १९, रा. गुलमोहर कॉलनी, रहाटणी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
तर अर्शद रमजान शेख (वय २१, रा. थेरगाव) हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मृत सुभानचे वडील हमीद नझीर शेख यांनी शुक्रवारी (दि. ८ मे) रोजी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी (दोघेही रा. थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुभान शेख आणि एका तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधाला त्या तरुणीच्या आईचा तीव्र विरोध होता. तरुणीच्या आईचा मित्र असलेला आरोपी विशाल सूर्यवंशी याने सुभानला या प्रेमसंबंधातून बाजूला होण्यास सांगितले होते. याच कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता. शुक्रवारी (दि. ७ मे) रात्री ११ वाजेच्या सुमारास थेरगावमधील शिवशंकर कॉलनी आणि श्रीकृष्ण दूध डेअरी समोरील रस्त्यावर आरोपी विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांनी सुभानला गाठले.
त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात आरोपींनी जवळ असलेल्या चाकू आणि चॉपरने सुभानच्या हातावर, पोटावर आणि मानेवर सपासप वार केले. सुभानला वाचवण्यासाठी आलेल्या अर्शदवरही आरोपींनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.




