Sanjay Raut : “नोव्हेंबरमध्ये राजकिय उलथापालथ होईल”; संजय राऊत मोठा दावा

Sanjay Raut – महाराष्ट्राच्या राजकारणात नोव्हेंबर महिन्यात उलाथापालथ होईल. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत खटला सुरु आहे. आम्हाला न्यायदेवता न्याय देईल आणि तो जर न्याय मिळाला तर राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल, असा दावा शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, दिल्लीमध्ये उलथापालथ करण्याची क्षमता महाराष्ट्राच्या नेतृत्वात पूर्वी होती, आता ती नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी गैरप्रकार केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
रात्री पोलिसांच्या वाहनातून पैसे कसे वाटले गेले, याच्यावर देखील चर्चा झाली पाहिजे. या चर्चेत अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी सहभागी झाले पाहिजे. जर या चर्चेत ते सहभागी झाले तर संविधान लोकशाही अधिक बळकट होईल, असे ते म्हणाले.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाल्याने कर्जमाफीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही हंबरडा मोर्चा काढला. या मोर्चात उद्धव ठाकरे यांनी विचारलेला प्रश्नावर सरकारला उत्तरे द्यावे लागतील.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. करोना काळात महाराष्ट्राला जीवदान दिले. त्यांना हतबल मुख्यमंत्री म्हणणे म्हणजे स्वतः किती लाचार आहेत हेच मंत्री बावनकुळे दाखवत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
मागील अडीच वर्षांत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी उद्धव ठाकरेंनी अनेक आंदोलन केली आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतांचा अधिकार आणि मत चोरी हा विषय घरोघरी पोहोचवला आहे.
भाजप व त्यांच्या सत्तेतील पक्ष हे वेगळ्या पद्धतीने काही गैरप्रकार करू शकतील का, त्या संदर्भात आमचाही अभ्यास सुरू आहे. कारण हे गैरप्रकार केल्याशिवाय जिंकू शकत नाही. निवडणुका या निष्पक्ष व्हाव्या ही आमची भूमिका आहे, असेही राऊत म्हणाले.





