Abhishek Singhvi : अघोषित आणीबाणीला कालमर्यादा नाही; अभिषेक सिंघवी यांचे वक्तव्य

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक सिंघवी यांनी देशात १९७५ यावर्षी लागू करण्यात आलेली आणीबाणी ही चूक असल्याचे मान्य केले. त्याचवेळी त्यांनी सध्याच्या स्थितीवरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. १९७५ मधील आणीबाणीचा कालावधी १८ महिने होता. मात्र, सध्याच्या अघोषित आणीबाणीला कुठलीही कालमर्यादा नाही, असे त्यांनी म्हटले.
सध्या देशात भीतीचे वातावरण आहे. राज्यघटनेवर कब्जा करण्यात आला आहे. लोकशाहीचे स्तंभ थरथरत आहेत. धर्मनिरपेक्षतेच्या चिंधड्या केल्या जात आहेत. संघराज्यवादाची मोडतोड होत आहे. घटनात्मक संस्थांना अक्षम बनवणारे, सत्याची गळचेपी करणारे युग आम्ही अनुभवत आहोत, असे सिंघवी राज्यसभेत बोलताना म्हणाले. अनेक देशांत लोकशाही लटपटत आहे.
मात्र, भारतातील लोकशाही अजूनही मजबूत आहे. ती स्थिती बनण्यासाठी गांधी-नेहरू-पटेल यांनी नक्कीच काहीतरी चांगले केले असेल, अशा उपहासात्मक शैलीत त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. भाजपेतर पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांत सरकार विरूद्ध राज्यपाल असा संघर्ष होताना दिसतो. त्याचा संदर्भ देऊन सिंघवी यांनी काही राज्यपाल सहकार्याच्या संघराज्यवादाशी संबंधित तत्वांविरोधात कार्यरत असल्याचे टीकास्त्र सोडले.





