Sunil Tatkare : “आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही, सुनेत्रा पवारांना आम्ही सगळ्या गोष्टी सांगतो;” सुनील तटकरेंचं वक्तव्य
Sunil Tatkare : आज अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत ज्या चर्चा सुरू झाल्या आहेत त्यावर सविस्तर भाष्य केलं.

Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कथित गुप्त बैठकीमुळे पडद्याआड सुरू असलेल्या राजकारणाची जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी अचानक वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यंची भेट घेतली. याचदरम्यान शरद पवार गटाचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने विविध तर्क वितर्कांना उधाण मिळालं.
विविध चर्चा सुरू झाल्यानंतर अखेर जयंत पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांची भेट कशासाठी घेतली याविषयी सविस्तर सांगतलं. तर आज अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत ज्या चर्चा सुरू झाल्या आहेत त्यावर सविस्तर भाष्य केलं.
धक्कादायक म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली याची कल्पना पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना नव्हती. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विसंवाद सुरू असल्याची कुजबूज रंगली आहे. याबाबत सुनेत्रा पवारांनी सुनील तटकरेंनी पक्षाच्या बैठकीत जाब विचारल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती. या चर्चांवर सुनील तटकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. (Sunil Tatkare)
नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे? (Sunil Tatkare)
“आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सध्या ज्या चर्चा सुरू आहेत, त्या चुकीच्या आहेत. शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील आणि आमची भेट देखील झालेली नाही. मी ४० वर्षे राजकारणात आहे. मला राजशिष्टाचार माहिती आहे. सुनेत्रा पवार आणि आमच्यात चांगलं टूनिंग आहे. सुनेत्रा पवारांना आम्ही सगळ्या गोष्टी सांगतो.”
तटकरे-पटेल आणि पाटील यांच्यात बैठक झाल्याची चर्चा (Sunil Tatkare)
जयंत पाटील यांच्यासोबत बैठक झाल्याच्या चर्चांवर सुनील तटकरे म्हणाले, “जयंत पाटील आणि आमची भेट देखील झाली नाही. त्यांचा खुलासा देखील आम्ही ऐकला. त्याच्या नगरपालिका निवडणुका अनुषंगाने भेट झाली. सुनेत्रा पवार यांनी बोलावून घेतलं असं नाही. मुख्यमंत्र्यांची प्रत्येकवेळी होणारी भेट राजकीय असते असं नाही मतदारसंघातील कामे देखील असतात. ”
माध्यमांमध्ये असलेल्या चर्चेनुसार, जयंत पाटील आले आणि आम्ही फडणवीसांकडे गेलो आणि अर्थखाते मागितले हा कुठला तर्क मांडला हेच मला कळलं नाही. जयंत पाटील यांचा याच्याशी काय संबंध? असा सवाल करत जयंतरावांनी काल त्यांची भेट कशासाठी झाली हे कालच स्पष्ट सांगितलं, असे सुनील तटकरे म्हणाले.
जयंतरावांच्या भेटीचा दुरान्वयेही, काडीमात्र काही संबंध नाही : तटकरे (Sunil Tatkare)
जयंतराव सुद्धा वरिष्ठ नेते आहेत. एकत्रित राष्ट्रवादीचं काम त्यांनी पाहिले आहे. ते अनुभवी नेते आहेत. ते स्वयंभू नेते आहेत. राज्याचं अर्थखातही त्यांनी पाहिलं आहे. आमच्या दोघांच्या (फडणवीस आणि तटकरे) भेटीचा आणि जयंतरावांच्या भेटीचा दुरान्वयेही, काडीमात्र काही संबंध नाही. असे म्हणत सुनील तटकरे यांनी सुरू असलेल्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.






