पुणे शहरात आणखी २५ ठिकाणी झाडपडी

पुणे – मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या बेमोसमी पावसाने शहर-उपनगरांत मोठ्या प्रमाणात झाडपडीच्या घटना घडत आहेत. गेल्या आठवड्यात सुमारे शंभरपेक्षा अधिक ठिकाणी अशा घटनांची नोंद करण्यात आली. त्यात शनिवारी आणखी २५ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. यात जीवितहानी झाली नसली, तरी वाहनांसह मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
मागील दहा दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात सुरू असलेला अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह पडत आहे. त्यामुळे पावसाला सुरुवात होताच झाडपडीच्या घटना वाढत आहेत. शनिवारीदेखील हडपसर, कोंढवा, वानवडी, भवानी पेठ, धायरी आणि कात्रज परिसरांत 25 हून अधिक झाडपडीच्या घटना घडल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, वाहनांचे नुकसान झाले. काही ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्यामुळे वाहतक ठप्प झाली. तर पुणे-सोलापूर रस्त्यावर होर्डिंग पडल्याची घटना समोर आली.





