‘…तर भावासोबत केंद्रीय मंत्री झाले असते’ – सुप्रिया सुळे

जळगाव- महिलांना सत्तेपेक्षा स्वाभिमान जास्त महत्वाचा असतो, मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते. पण मी माझ्या 80 वर्षाच्या स्वाभिमानी वडिलांसोबत उभी राहिले याचा मला अभिमान आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
सुळे म्हणाल्या एक देश एक निवडणुकीचा नारा देणारे सरकार महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकलत आहे. याचा अर्थ सरकार डर रही है, कारण राज्यातील महायुतीचे नेते निष्क्रिय असल्यामुळेच पंतप्रधानांना महाराष्ट्रात यावे लागत आहे, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
तसेच, दोन पक्ष फोडण्याचे देवेंद्र फडवणीस यांना कौतुक वाटत असेल तर ते दुर्दैवी आहे. मी पक्षाकडे खासदारकीचे तिकीट सोडून काहीही मागत नव्हते. कारण संसदेत पहिला नंबर येत असल्यामुळे मी मेरिटवर खासदारकीचे तिकिट मागितले, तर तो गुन्हा आहे का?, असा सवाल सुळेंनी उपसथित केला आहे.
शेतकऱ्यांचा हमीभावाचा निर्णय घेऊ
आपली सत्ता आल्यानंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या हमीभावासंबंधीचा घेईल, असेही सुळे यांनी म्हटले आहे. आता पुढील 90 दिवस आपल्याला स्वाभिमानासाठी लढायचे आहे.
देशातील जनता खोकेवाली नाही, तर इमानदार आणि प्रामाणिक आहे, हे त्यांनी लोकसभा निकालात दाखवून दिले आहे. तर मी कष्टाची परिकाष्टा करेन आणि सत्याच्या मार्गाने चालेन. पण कधीही दिल्ली समोर मुजरा करणार नाही, असेही सुळेंनी म्हटले आहे.





