“…तर तालुका कृषी अधिकारी जबाबदार”, राधाकृष्ण विखे पाटलांचा इशारा

नगर – बियाणे व खते कमी पडणार नाहीत. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार कृषि निविष्ठा देण्यात यावी. बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक अथवा लिंकिंगचे प्रकार होणार नाहीत, याची काळजी द्या. ज्या तालुक्यात जादा दराने बियाणे, खत विक्री अथवा शेतकऱ्यांच्या फसवणुकीसह लिंकिंगचे प्रकार घडतील, त्या तालुका कृषी अधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी दिला.
खरीप हंगाम पुर्व नियोजन व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सदाशिव लोंखडे, आमदार लहु कानडे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धीराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश ओला, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आत्मा’चे प्रकल्प संचालक विलास नलगे आदी उपस्थित होते.
खरीप हंगाम आढावा बैठकीत फारशी चर्चा न करता ही बैठक आटोपती घेण्यात आली. अवघ्या तासभरात ही बैठक संपली. यावेळी बोलतांना मंत्री विखे म्हणाले की, हंगामात जिल्हा बॅंक शेतकऱ्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करू देते. मात्र राष्ट्रीयकृत बॅंकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ होते. त्यामुळे याबाबत राष्ट्रीयकृत बॅंकेची स्वतंत्र बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी, अशी सुचना केली. शेतकऱ्यांसाठी नव्याने सहा योजना आणल्या आहेत. मात्र त्या योजनांच्या प्रचार व प्रसार करण्यास विभाग कमी पडत आहे.
या योजनांसाठी दरमहा बैठक घेऊन आढावा घेण्याची सुचना करण्यात आली. या खरीप हंगामात अधिकाऱ्यांनी जागृतपणे आपले कामे केले पाहिजे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामांवर सरकारची प्रतिमा अवलंबून असते. हे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्यावे असे मंत्री विखे म्हणाले.
यंदा 20 टक्के उत्पादन वाढवा
कृषि अधिकाऱ्यांनी मागील तीन वर्षाच्या उत्पादनाची माहिती घेऊन त्यात यंदा वाढ कशी होईल, त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 20 टक्के उत्पादन वाढवावे. शेतकरी उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करतो. पण त्याला योग्य मार्गदर्शन कृषि अधिकाऱ्यांनी केले पाहिजे, असे मंत्री विखे म्हणाले.
एक रुपयात विमा योजनेत जिल्हा अव्वल करा
पिक विम्याबाबत शेतकरी नाराज असल्याने आता विमा योजनेकडे ते दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शासनाने एक रुपयात पिक विमा ही योजना नव्याने आणली असून यात योजनेत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेऊन जिल्हा राज्यात अव्वल करण्याचे आदेश मंत्री विखे यांनी यावेळी दिले.





