“विखे आला अन् महाराष्ट्रात विखार पसरवून गेला… सोडणार नाही; छगन भुजबळांचा विखे पाटलांवर थेट हल्ला

बीड : महाराष्ट्रातील आरक्षण वादाने पुन्हा उग्र रूप धारण केले असून, बीडमधील ओबीसी महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यासह मंत्रीमंडळातील सहकारी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
“विखे आला आणि महाराष्ट्रात विखार पसरवून गेला… गेला तर गेला, पण जीआर काढला,” असा घणाघात करत भुजबळ यांनी विखे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेची कठोर चीज केली. या सभेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, मराठा-ओबीसी संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.
बीडमधील संभाजी महाराज क्रीडांगणात आयोजित ओबीसी महाएल्गार सभेत राज्यभरातील ओबीसी नेत्यांची मोठी गर्दी झाली. मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी हजेरी लावली. ही सभा मराठा आरक्षणाच्या नुकत्याच काढलेल्या जीआरविरोधात आयोजित करण्यात आली असून, ओबीसी समाजाने आरक्षणाच्या संरक्षणाची मागणी लावून धरली आहे.
“कारण नसताना जरंगेंकडे जातात”, विखे पाटलांवर घणाघात
भुजबळ यांनी विखे पाटलांच्या मनोज जरांगे यांच्या भेटींवरून थेट प्रश्न उपस्थित केला. “विखे पाटील कारण नसताना जरांगेंकडे जातात. भाजपच्या लोकांना सांगायचे आहे की, तुमच्या लोकांना आवरा,” असा इशारा देत त्यांनी विखे पाटलांच्या भूमिकेला जबाबदार धरले. २ सप्टेंबरला काढलेल्या मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, “मुख्यमंत्री नागपूरला होते, तेव्हा विखे यांनी निर्णय घेतला आणि ‘पात्र’ शब्द काढला.
हे ओबीसी आरक्षणावर अतिक्रमण आहे. सीएमला सांगायचे आहे, ओबीसीवर अन्याय केला तर दुधखुळे राहिले नाहीत.” ही टीका करताना भुजबळ यांनी विखे पाटलांना “विखार” पसरविणारे म्हटले आणि त्यांना सोडणार नाही, असा ठणकावून सांगितले. व्हिडिओमध्ये भुजबळ यांच्या या वक्तव्याला सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला.
भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवरही कडाडून हल्ला चढवला. “तुम्ही बीडमध्ये धुडगूस घातला, आमदारांची घरे जाळली, ओबीसी नेत्यांवर हल्ले केले… पण निषेधही केला नाही,” असा आरोप करत त्यांनी मराठा आंदोलनातील हिंसाचाराचा उल्लेख केला. “जिथं हैदोस, तिथेच महाएल्गार,” असा थेट इशारा देत भुजबळ म्हणाले की, मराठा समाज आणि ओबीसी यांच्यातील अंतर हे जरांगे आणि विखे पाटलांच्या चुकीच्या भूमिकेमुळे वाढले आहे, असं भुजबळ यांनी म्हटले.





