…तर फक्त पत्नीलाच मिळणार लाभ; पीएम-किसानपासून लाडके भाऊ वंचित, रोहित पवारांनी साधला सरकारवर निशाणा

Rohit Pawar | केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. पती आणि पत्नीच्या नावावर शेती असेल तर केवळ पत्नीलाच मानधन दिला जाणार आहे. शेतकरी पतीला मानधन देण्यात येणार नसल्याचे समोर आले आहे. कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ देण्याचा निकष लागू करण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत कुटुंबातील पती-पत्नी दोघेही वेगवेगळ्या शेतीच्या नावावर लाभ घेत असतील तर त्यांना प्रत्येकी 6 हजार रुपये वार्षिक मानधन मिळत होते. मात्र, केंद्राने आता नवी अट लावून फक्त पत्नीलाच हा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे, तर पतींचे मानधन रोखण्यात आले आहे. या नव्या नियमामुळे महाराष्ट्रातील तब्बल 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना 20 वा हप्ता मिळालेला नाही. या निर्णयामुळे प्रभावित शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी आता शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी देखील एक पोस्ट शेअर केली आहे.
रोहित पवारांची टीका
कुटुंबात नवरा आणि बायको दोघांच्या नावावर शेती असल्याने दोन लाभार्थी असतील तर आता केवळ कुटुंबातील महिला लाभार्थ्यालाच पीएम किसानचे दोन हजार मिळतील पुरुष लाभार्थ्याला दोन हजार मिळणार नाहीत, हा केंद्र सरकारचा फतवा अजबच म्हणावा लागेल, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
जीएसटीत कपात करून पीएम किसान योजनेचे हफ्ते बंद
एकीकडे जीएसटीमध्ये कपात करून दिंडोरा पिटायचा आणि दोनच दिवसात शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे हफ्ते बंद करायचे? केंद्र सरकारला हे शोभते का? आधीच पीएम किसानचे पैसे मिळतात म्हणून लाडक्या बहिणींना लाडक्या बहीण योजनेच्या मदतीपासून राज्य सरकारने वंचित ठेवले आणि आता लाडक्या भावांना वंचित ठेवत आहात का? नैसर्गिक आपत्तीचा फटका आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका कुटुंबातील सर्वच शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे कुटुंबातील एकाच शेतकऱ्याला मदत देण्याचा निर्णय पूर्णतः चुकीचा आहे, केंद्र सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. Rohit Pawar |
हेही वाचा :
Amol Bawdekar : मला तशा वेदना होत नव्हत्या पण…; अभिनेते अमोल बावडेकरांनी शेअर केला तो अनुभव




