Rajnath Singh : “….तर भारत पाकिस्तानसोबत चर्चेसाठी तयार असेल” – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Rajnath Singh : जम्मू-काश्मीरमध्ये प्रचाराला सुरुवात झाली आहे. सध्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जम्मू-काश्मीर खोऱ्यातील रामबन विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारासाठी रॅली घेत आहेत. येथे त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) रहिवाशांना भारतात येऊन त्याचा भाग होण्यास सांगितले.
यावेळी त्यांनी रहिवाशांना सांगितले की, ‘आम्ही तुम्हाला आमचे मानतो तर, पाकिस्तान तुम्हाला परदेशी समजतो’. यासोबतच त्यांनी सांगितले की, ‘जर पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवले तर भारत चर्चेसाठी तयार असेल. असं देखील ते यावेळी म्हणाले.
रामबन विधानसभेत भाजप उमेदवार राकेश सिंह ठाकूर यांच्या समर्थनार्थ निवडणूक रॅलीला संबोधित करताना, त्यांनी कलम 370 पुनर्संचयित करण्याच्या निवडणुकीतील आश्वासनाबद्दल नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीवर जोरदार निशाणा साधला आणि सांगितले की जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत हे अशक्य आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षेच्या परिस्थितीत झालेल्या मोठ्या बदलाचे स्वागत केले आणि म्हणाले की तरुणांकडे पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हरऐवजी आता लॅपटॉप आणि संगणक आहेत.
पाकिस्तान पीओकेला परदेशी भूमी मानतो :
ते म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये पुढील सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला पाठिंबा द्या, जेणेकरून आम्ही या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर विकास करू शकू. एवढा विकास होईल की पीओकेचे लोक बघतील आणि म्हणतील की आम्हाला पाकिस्तानात राहायचे नाही, आम्ही भारतात जाऊ.
संरक्षण मंत्री पुढे म्हणाले, ‘शेजारील देशातील अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी अलीकडेच प्रतिज्ञापत्र दाखल करून म्हटले आहे की पीओके ही परदेशी भूमी आहे. मला पीओकेमधील रहिवाशांना सांगायचे आहे की, पाकिस्तान तुम्हाला परदेशी मानत आहे, पण भारतातील लोक तुम्हाला तसे मानत नाहीत. आम्ही तुम्हाला आमचे स्वतःचे मानतो, म्हणून या आणि आमचा एक भाग व्हा. असं देखील ते म्हणाले.
संरक्षण मंत्री जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर :
भाजपचे स्टार प्रचारक म्हणून संरक्षणमंत्री जम्मू-काश्मीरला भेट देत आहेत. याच्या एक दिवस आधी गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात पक्षाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यालाही संबोधित केले. यासोबतच त्यांनी बनिहालमध्ये रॅलीही काढली.





