मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी विरोधक चांगलेच आक्रमक झाले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरील विश्वास दर्शक ठरावावरून त्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. सोबतच दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दाही विधानसभेत गाजला. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी तत्कालीन मंत्र्याला अटक करा अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात केली आहे. शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांवर अत्याचाराची घटना घडली तर संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्याची तरतूद असावी अशी मागणी सदस्य चित्रा वाघ यांनी केली. यावर सकारात्मक विचार केला जाईल असे शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी सांगितले. महाराष्ट्र मलेरियामुक्त करण्यासाठी आमच्यासोबत भागीदारी सकाळी मुंबईत बिल गेट्स यांना भेटून आणि त्यांचे स्वागत करून खूप आनंद झाला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील युवक, शेतकरी, गरीब आणि महिलांसाठीच्या उपक्रम आणि योजना, जसे की लखपती दीदी आणि लाडकी बहिण योजना, ज्यांनी आर्थिक उन्नतीमध्ये मोठे योगदान दिले आहे, यासह विविध विषयांवर आमची खूप चांगली चर्चा झाली. राज्यभरात वेगाने बदलणाऱ्या नवीनतम तंत्रज्ञानाचा अवलंब आणि एआय-चालित उपक्रमांबद्दलही बोललो. बिल गेट्स यांनी सांगितले की, गेट्स फाउंडेशन महाराष्ट्र मलेरियामुक्त करण्यासाठी आमच्यासोबत भागीदारी करेल. आम्ही आरोग्य, शेती आणि पायाभूत सुविधांमध्ये एआय-चालित प्रगती, डेंग्यू नियंत्रण आणि नाविन्यपूर्ण शहर भागीदारी यावर देखील चर्चा केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मविआ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले. भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या भेटीला दाखल झाले. त्यांच्या सोबत जयंत पाटील देखील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले होते. विरोधी पक्षनेते पदासंदर्भात भेट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सभापतींचा काळ्या फिती लावून निषेध सरकारला साथ देऊन पक्षपातीपणा करणाऱ्या विधान परिषद सभागृहाचे सभापती राम शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत विधिमंडळ पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. लोकशाहीचा खून करणाऱ्या सभापतीचा काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या आमदारांकडून राज्यपालांची भेट सत्ताधारी पक्षाला साथ देऊन नियमबाह्य पद्धतीने काम करणाऱ्या सभापती आणि अध्यक्ष यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन निवेदन दिले. संसदीय प्रणालीमध्ये विरोधी पक्ष हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांची भूमिका ही सरकार विरोधी नसून सरकारच्या निर्णयावर आणि धोरणांवर अंकुश ठेवणारी आहे. आवश्यक तेथे टीका करणे आणि पर्यायी धोरण सुचविणे आहे. महाराष्ट्र विधानपरिषद व विधानसभा सभागृहामध्ये सभापती व अध्यक्ष यांचेकडून सभागृहाच्या कामकाजात पक्षपाती व एकांगी भूमिकेचा अवलंब केला जात आहे. दोन्ही सभागृहाच्या कार्यवाहीमध्ये संसदीय परंपरांचे पालन न करता नियम बाह्य सभागृहाचे कामकाज चालविले जात असल्याची माहिती राज्यपाल यांना दिली. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधिमंडळ गटनेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अनिल परब, भास्कर जाधव, भाई जगताप,शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, सुनील राऊत,सचिन अहिर, आनंद बाळा नर, प्रवीण स्वामी, अभिजित वंजारी, अजय चौधरी, सुनील शिंदे, अरुण शेठ, ज. मो. अभ्यंकर, मनोज जामसुतकर, सिद्धार्थ खरात, कैलास पाटील व वरुण सरदेसाई उपस्थित होते.