कुस्तीपटूंनी दिला अल्टिमेटम; ब्रिजभूषण शरणसिंग यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता….

नवी दिल्ली -ब्रिजभूषण शरणसिंग यांना 21 मेपर्यंत अटक करा, अन्यथा आम्ही काहीतरी ठोस निर्णय घेऊ, असा इशारा भारतीय कुस्तीगीर महासंघाला आंदोलक कुस्तीपटूंनी दिला आहे. या कुस्तीपटूंनी 31 सदस्यांच्या समितीने दिलेल्या सल्ल्यानंतर हा इशारा दिला आहे. शेतकरी संघटनेनेही या कुस्तीपटूंना पाठिंबा दिला असला तरीही आम्ही त्यांच्या प्रभावाखाली नसल्याचा खुलासाही विनेश फोगटने केला आहे.
कुस्तीपटूंनी दोन समित्या स्थापन केल्या असून, त्यातील एक समिती 9 तर दुसरी समिती 31 सदस्यांची आहे. आंदोलक कुस्तीपटूंची भारतीय किसान संघटनेचे प्रवक्ते राकेश टिकैत, खाप महापंचायत 24 चे प्रमुख मेहर सिंह आणि संयुक्त किसान मोर्चाचे बलदेवसिंग सिरसा यांनी भेट घेतली.
कुस्तीपटूंनी 21 मे रोजी एका बैठकीचे आयोजन केले आहे. तोपर्यंत महासंघाने तसेच सरकारने काही निर्णय न घेतल्यास आम्ही पुढील दिशा व निर्णय जाहीर करू, असेही विनेशने म्हटले आहे. कुस्तीगिरांच्या मागणीनुसार ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कलम 161 नुसार सात महिला कुस्तीपटू तक्रारदारांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.
स्पर्धेत सहभाग घेता येणार
देशातील नामांकित कुस्तीपटू जरी या आंदोलनात सहभागी असले तरीही त्यांना आशियाई ट्रायल स्पर्धांमध्ये सहभागी होण्यापासून रोखता येणार नाही, असा खुलासा भारतीय ऑलिम्पिक महासंघाने केला आहे. विनेश फोगट, बजरंग पुनिया यांच्यासह ज्या कुस्तीपटूंना या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांना परवानगी दिली जाइल, असेही संघटनेने म्हटले आहे.





