“बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची जगाला गरज”

कोपरगाव – जगाला समता, अहिंसा, शांतता, ज्ञान व मानवतावादाचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध हे प्रयत्नवादी, अहिंसावादी, बुद्धिप्रामाण्यवादी होते. मानवी जीवन आनंददायी, सुंदर करण्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाची व समतावादी विचारांची आज जगाला खरी गरज आहे, असे मत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले.
कोपरगाव येथील बुद्ध धम्म प्रसारक मंडळ (ट्रस्ट) तर्फे विश्वशांतीदूत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती शुक्रवारी नगर-मनमाड महामार्गावरील लुंबिनी उपवन बुद्ध विहार येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोल्हे बोलत होते. यावेळी भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कोल्हे म्हणाले, “मानवी जीवनातील दु:ख निवारण्यासाठी गौतम बुद्धांनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी असे आठ मार्ग सांगितले होते. त्यांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा वापर करून त्यांच्या विचारांप्रमाणे प्रत्येकाने आचरण करणे गरजेचे आहे.” यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे तेलंगणा राज्याचे अध्यक्ष प.पू.भिक्खू डॉ. राष्ट्रपाल महाथेरो, संघाचे जिल्हा सचिव प.पू. भिक्खू कश्यपजी, संघाचे सदस्य प.पू. भिक्खू दीपरत्न, कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, रिपाइं (आठवले गट) नेते दीपकराव गायकवाड, महाराष्ट्र बॅंकेचे शाखाधिकारी अनिल जगताप, ऍड. भास्करराव गंगावणे, ऍड. नितीन गंगावणे, ऍड. सुरेश मोकळ उपस्थिती होती.





