Nagar : उन्हाळ्यात पूर्ण क्षमतेने शेतकरी बांधवांना आवर्तन मिळावे

कोपरगाव : चालू पावसाळी हंगामात उशीराने पर्जन्यमान झाल्याने गोदावरी कालवे लाभधारक शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळ हंगामाच्या पाण्याच्या आवर्तनात योग्य नियोजन करून देण्यात येणारे आवर्तने पुरेसे क्षमतेने द्यावी म्हणजे त्यामुळे अधिकचे आवर्तन न लागता शेतकऱ्यांच्या पाणीट्टीत बचत होईल. गोदावरी कालव्यांचे आर्युमान शंभर वर्षापेक्षा जास्त झाले असून, त्याच्या नूतनीकरणासाठी धडक कृती कार्यक्रम हाती घ्यावा, अशी मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कालवा सल्लागार बैठकीत बोलताना केली.
जिल्हा सहकारी बँकेच्या राहाता शाखेतील सभागृहात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली बारमाही गोदावरी कालवे लाभधारक कालवा सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली, त्यात विवेक कोल्हे बोलत होते. तुटीच्या गोदावरी खोऱ्यात पश्चिमेचे समुद्राला अतिरिक्त वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवावे म्हणून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी विधिमंडळात मंजुरी घेतली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कृष्णा खोऱ्याप्रमाणे कार्यक्रम राबवून नगर-नशिकसह मराठवाडयाच्या प्रादेशिक पाणीवादात शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असेही ते म्हणाले.
कोल्हे पुढे म्हणाले की, उन्हाळयात तीन आर्वतने दिली तर शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची ८ हजार ५०० रुपये पाणीपट्टीचा दंड पडतो. तेव्हा आहे त्या पाण्याच्या दोन आर्वतनात बचत करून तिसरे उन्हाळ पाण्याचे आर्वतन दिल्यास शेतकऱ्याच्या पाणीपट्टीत ३ हजार ५०० रुपयांची बचत होणार आहे. उन्हाळ हंगाम आर्वतनाचा कालावधी वाढवावा. कालवा आर्वतन सोडण्यापूर्वी ज्या चाऱ्या, उपचाऱ्या आहे, त्याची दुरुस्ती करावी. गोदावरी कालवे नूतनीकरणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. उजव्या कालव्यासाठी १९१ कोटींचा निधी मंजूर झाल्याचे समजले, मात्र डाव्या कालव्यास अजून निधीच मंजूर नाही, तेव्हा तो तातडीने उपलब्ध व्हावा. बिगर सिंचन पाण्याचा भार दारणा, गंगापूर धरण कार्यक्षेत्रावर वाढतो आहे. त्याचा फटका बारमाही गोदावरी कालवे लाभधारकांना बसत आहे, त्यासाठी पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे आणले जावे, असे ते शेवटी म्हणाले.
याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा.आ.स्नेहलता कोल्हे,आ. आशुतोष काळे, आ. हेमंत ओगले, उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, उजव्या तट कालव्याचे उपअभियंता संभाजी पाटील, डाव्या कालव्याचे उपअभियंता संदीप पाटील, विविध सहकारी पाणीवापर संस्थांचे पदाधिकारी, लाभधारक शेतकरी, सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आदी मोठया संख्येने उपस्थित होते.





