नवनवीन प्रकल्प राबवण्यात कोल्हे कारखाना कायम अग्रभागी विवेक कोल्हे , कोल्हे कारखान्याची ६२ वी सर्वसाधारण सभा

कोपरगाव : केवळ ऊसावर नाही तर शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मका, गिन्नी गवत, बांबूसह इतर पिकांपासून कोल्हे साखर कारखाना अनेक उपपदार्थ बनवून शेतकऱ्यांच्या हितासाठी अग्रभागी कार्य करणारा देशातील पहिला कारखाना असल्याचे गौरवोद्गार सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी काढले.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६२ वी सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर शनिवारी पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, व्हा. चेअरमन मनेश गाडे ,कार्यकारी अधिकारी बाजीराव सुतार, शिवाजी दिवटे, संचालक विश्वास महाले, ज्ञानेश्वर परजणे, उषा औताडे, सोनिया पानगव्हाणे, विलास वाबळे, केशव भवर, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकरसह अनेक संचालकांची उपस्थिती होती. यावेळी गेल्या गळीत हंगामामध्ये विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान कोल्हे यांच्याहस्ते करण्यात आला.
विवेक कोल्हे म्हणाले की, केंद्र शासनाचे इथेनॉलबाबतचे धोरण, साखर निर्यातीचा निणर्य ,उपपदार्थ निर्मितीसाठी वाढवलेले पाण्याचे दर यासह अनेक अडचणींवर कारखान्याने मात करत मार्गक्रमण केले आहे.उपपदार्थ निर्मितीसह विविध प्रकल्पामुळे संजीवनी उद्योग समूह इतरांच्या तुलनेत कुठेही मागे नाही. केंद्राने एफआरपीची रक्कम वाढवली, त्याच धर्तीवर एमएसपीमध्ये वाढ करून दोघांत सुसूत्रता आणावी. गेल्या दहा वर्षात कोल्हे कारखान्याने ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा जास्त १५० कोटी रुपये अदा केले. सभासद, कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गोड करणार आहे.
वाढत्या मधुमेह रोगाच्या पार्श्वभूमीवर जगात शुगर फ्री साखरेला मागणी वाढली आहे. त्यामुळे कोल्हे कारखान्याने शुगर फ्रीचे उत्पादन यशस्वी केले आहे. अत्याधुनिक तंत्रद्यानाचा वापर करत सॅटेलाईटद्वारे शेतकऱ्यांच्या उसाची माहिती, ड्रोनने औषधे फवारणी, हार्वेस्टिंग मशीनसाठी व्याजात सूट, इफ्कोचा नॅनो युरिया व इतर उत्पादने, सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मत्सपालनाचा लाभ शेतकरी घेत आहे. मका,बांबूपासून अल्कोहोल निर्मितीचा प्रकल्प भविष्यात उभारण्यात येणार आहे. स्पेंटवाश, गिन्नी गवतापासून सीएनजी, बीएनजीचा १२ टन क्षमतेच्या प्रकल्पावर काम सुरू असून, येत्या काही महिन्यांत नव्या प्रकल्पाचा शुभारंभ करणार आहे. कारखान्याद्वारे राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून ऊस उत्पादकांना जास्तीचा भाव मिळण्यास निश्चित मदत होणार असल्याचे कोल्हे म्हणाले.
अध्यक्षपदावरून बोलताना बिपीन कोल्हे म्हणाले की, विद्यमान लोकप्रतिनिधींनी केवळ तीन हजार कोटींच्या गप्पा मारू नये. पाण्यामुळे शेती उजाड होत आहे. पश्चिमेकडील पाणी पूर्वेला वळण्यासाठी काय केले याचे उत्तर द्यावे, असे म्हणत आमदार काळे यांच्यावर निशाणा साधत भविष्याचा वेध घेत वर्तमानातील स्थितीचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला.
कै. शंकरराव कोल्हे यांनी दूरदृष्टी ठेवून भाम, भावलीसह विविध धरणांची निर्मिती केली. अहोरात्र काम केले. प्रसंगी स्वकीयांविरुद्ध लढा दिला. त्यातून सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला. जनतेने त्यांना ३५ वर्षे संधी दिली. तुमच्या कारकिर्दीत समन्यायी पाणी वाटप कायदा आला. पाण्यासाठी लोकप्रतिनिधी ऐवजी आपल्याला भांडावे लागते, ही शोकांतिका आहे. संधीसाधू राजकरणी म्हणून विद्यमान आमदारांची ओळख आहे.
– विवेक कोल्हे ,अध्यक्ष, कोल्हे सहकारी साखर कारखाना.





