Nagar | महिला नाचवायच्या नाहीत तर वाचवायच्या आहे

कोपरगाव (प्रतिनिधी) – दहीहंडी उत्सवानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी पार पडली.
मोठ्या संख्येने कोपरगाव शहर आणि तालुक्यातून गोविंदा पथक व नागरिकांनी हजेरी लावली. हजारो नागरिकांनी गर्दी करून गोविंदांना प्रोत्साहन देत होते, हे क्षण अविस्मरणीय आनंद देणारे ठरले.
महिलेशी असभ्य वर्तन केले म्हणून रांझे गावच्या बाबजी गुजरचे हात पाय कलम करण्याची शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी दिली होती, तो प्रसंग हुबेहूब साकारला गेला. दहीहंडी स्त्री संरक्षणाची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची, अशी थीम घेण्यात आली होती.
महिला नाचवायच्या नाही तर वाचवायच्या आहेत, या आशयाचे फलक युवकांनी झळकावले. त्यावर भाष्य करताना विवेक कोल्हे यांनी महिलांचा आदर करणारे युवक घडवणे हे आपले ध्येय आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठान हे नेहमीच आदर्श उपक्रम राबवते.
यावेळी कुठली सिने कलाकार न बोलवता मंजूर येथे गोदावरीत वाहून जाणाऱ्या युवकांना वाचविण्यासाठी आपली साडी पाण्यात फेकणाऱ्या ताईबाई पवार यांना निमंत्रित करून सत्कार करण्यात आला.
त्याच आजच्या सेलीब्रेटी आहेत, असे म्हणताच गोविंदा पथकांनी एकच जल्लोष केला. दहीहंडी यशस्वी करण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवासेवक आणि उत्सव समितीचे कोल्हे यांनी कौतुक केले.
अनेक गोविंदा पथकांनी प्रयत्न करून दहीहंडी फुटली नाही. त्यामुळे काही उंची कमी करून सर्व पथकांनी मिळून दहीहंडी फोडली. या दहीहंडीचे बक्षीस सर्वांना विभागून देण्यात आले. स्वतः विवेक कोल्हे यांनी तिसऱ्या थरावर जाऊन दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला.
यामुळे सर्वांनी कौतुकाने टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी विविध संस्था, संघटनाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, गोविंदा पथक, नागरिक, महिला भगिनी आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक उपस्थित होते.



