नगर | जलजीवन योजनेचे काम निकृष्ट

नगर, (प्रतिनिधी) – जल जीवन योजनेद्वारे ग्रामीण भागात घराघरात पिण्याचे पाणी पोहोचवण्याच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत निकृष्ट पाईप वापरले जात असल्याचा खुद्द दावा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. बहुचर्चित जलजीवन मिशन योजनेच्या कामावरआक्षेप घेतल्याने भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, त्यांनी जलजीवन मिशनच्या कामावर आक्षेप घेण्यातून स्वकियांवर निशाणा साधला की महाविकास आघाडीच्या मागच्या सरकारवर, याची खुमासदार चर्चा सुरूआहे.
सावेडीतील पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग चौकाजवळील भिस्तबाग महालाजवळील मैदानात आयोजित महासंस्कृती महोत्सवाचे उदघाटन गुरुवारी सायंकाळी पालकमंत्री विखेंच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. आबा पाटील सुंदर गाव व मागील साडेचार वर्षांपासून रखडलेल्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण केले.
त्यानंतर भाषणात ग्रामसेवकांच्या कामाचे कौतुक केले. गावातील सरपंच व सदस्यांच्या राजकारणात न पडता गाव विकासाचे काम ग्रामसेवकांकडून प्राधान्याने होते व गावाला आदर्श करण्यासाठीचे योगदानही दिले जाते, असे गौरवोदगारही काढले. मात्र, त्याचवेळी जलजीवन मिशन योजनेंतर्गत गावांतून होणार्या कामांकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची सूचनाही ग्रामसेवकांना केली. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करवून घेण्याची जबाबदारीही ग्रामसेवकांचीच असल्याचेही स्पष्ट केले.
यावेळी बोलताना मंत्री विखेंनी जलजीवन मिशन योजनेच्या कामावर टीका केली. गावांतील पाईपलाईनचे आराखडे ठेकेदारांच्या घरात आहेत. ठेकेदारांकडून घरात बसून या योजनेची कामे केली जात आहेत. योजनेत निकृष्ट पाईप वापरले जात आहेत. गावात योजना नेमकी कशी होते, हे ग्रामपंचायतीलाही माहिती नाही. ग्रामसेवकालाही विचारले जात नाही. त्यामुळेच जलजीवन योजनेच्या कामावर जनता समाधानी नाही, ते केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
जलजीवन मिशन आराखड्याचे अंतिम स्वरुप मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले होते. मात्र, त्याआधी राज्यात भाजपचे सरकार असताना जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन मिशनचा विचार सुरू होता. नगर जिल्ह्यातीलच मंत्री त्याचे काम पाहात होते. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विखेंनी नेमका निशाणा स्वकियांवर साधला की मविआवर याचीही खुमासदार चर्चा रंगू लागली आहे.
जीवन प्राधिकरणामध्ये सावळा गोंधळ सुरू
जीवन प्राधिकरणामध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. राज्य सरकारचा पैसा खर्च होत आहे. त्यामुळे सरकारची प्रतिमा ग्रामसेवकांच्या हाती आहे. तुम्ही चांगले काम केले तर शासनाची प्रतिमा उंचावते व चुकीचे काम केले तर शासन बदनाम होते. अशा स्थितीत आता ग्रामसेवकांनी जलजीवन मिशनचे काम आपापल्या गावात दर्जेदार करवून घेण्याची जबाबदारी पार पाडावी.
जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयांनीही या कामात त्यांना पाठबळ द्यावे, असे आवाहनही मंत्री विखे यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचे नाव घेऊन केले.





