Jaljeevan Mission : जलजीवन मिशनचे कंत्राटदार अडचणीत; सरकारकडे तब्बल 35 हजार कोटींची थकबाकी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील रहिवासी आणि कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. जलजीवन मिशनच्या कामाची तब्बल ३५ हजार ६२२ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांनंतर जलजीवन मिशनचे काम करणा-या कंत्राटदारांपुढे मोठे संकट असल्याचे दिसून येत आहे.
हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशनअंतर्गत गावांमध्ये पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण केले होते. मात्र, शासनाकडून कामाचे पैसे न मिळाल्यामुळे आणि त्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या मानसिक त्रासामुळे त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर सरकारवर जोरदार टीका होत आहे. सरकारकडून वेळेत बिल मिळत नसल्याने आत्महत्या केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केला आहे.
तर सरकारने वेळेत पैसे न दिल्याचे आरोप महायुतीच्या मंत्र्यांनी फेटाळले आहेत. मात्र, आता जलजीवन मिशनच्या कामाची तब्बल ३५ हजार ६२२ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. केंद्राकडून तब्बल १९ हजार २५९ कोटी रुपये येणे बाकी आहे. तर राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून १६ हजार ३६३ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे.





