Nagar | पूर्णाकृती पुतळ्याचे काम लवकरच मार्गी लावू

श्रीरामपूर, (प्रतिनिधी) – वन विभागाशी पत्रव्यवहार करून लवकरात लवकर श्रीरामपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठीच्या परवानगीचे काम मार्गी लावू ,असे ठोस आश्वासन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.
आठवले हे भर पावसात श्रीरामपूर रेल्वे स्टेशन परिसरात आले असता त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांना रामदास आठवले यांनी पूर्णाकृती पुतळा संदर्भात काय अडचण आहे ते विचारले असता त्रिभुवन यांनी एक नोटिफिकेशन मिळत नसल्याने जिल्हाधिकारी हे आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यास परवानगी देत नाहीत, असे सांगितले.
त्यावर ना.आठवले यांनी वन विभागाशी पत्रव्यवहार करून लवकरात लवकर श्रीरामपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे परवानगीचे काम मार्गी लावू, असे ठोस आश्वासन दिले.
डॉ.आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यास जागा कमी पडेल हे रामदास आठवलेंच्या लक्षात आले असता त्रिभुवन यांनी पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे बाबासाहेबांच्या पुतळ्यालगतची दोन गुंठे जागेची मागणी केली आहे.
रामदास आठवले यांना जागे संदर्भात रेल्वे प्रशासनास पत्रव्यवहार करू, असे आश्वासन दिले. लवकरच श्रीरामपूरकरांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे स्वप्न साकार होणार आहे.





