श्रीरामपूर: निवडणूक निरीक्षक अरुण कुमार यांनी घेतला निवडणूक कामाचा आढावा

श्रीरामपूर – विधानसभा सार्वत्रिक निवडणूककरिता श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील निवडणूक कार्यालयास केंद्रीय निवडणूक निरीक्षक अरुण कुमार यांनी भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत पाटील व सहाय्यक निवडणूक अधिकारी मिलिंद कुमार वाघ यांनी कामकाजाविषयी माहिती दिली. केंद्रीय निरीक्षक यांनी निवडणुकीचे नोंदणी कार्यालय, स्ट्रॉंगरूम, एम.सी.सी, कंट्रोल रूम, साहित्य विभाग, सी.सी.टी.व्ही, आचारसंहिता कक्ष आदींची याची पाहणी करून कामकाजाविषयी सूचना केल्या. कंट्रोल रूमची पाहणी करून आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले.
स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेतेबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्याकडून सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळेस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंदकुमार वाघ, नगरपरिषद मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे, महसूल नायब तहसीलदार बाबासाहेब गोसावी, सुनिता धिमते, नायब तहसीलदार दतात्रय शेकटकर, निवडणूक नायब तहसीलदार हेमलता वाकडे, शिरस्तेदार वनिता कल्हापुरे आदी तसेच अधिकारी व पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.
श्रीरामपूर तालुक्याच्या हद्दीमधील टाकळीभान येथील एफएसटी व एसएसटी पथकांना केंद्रीय निवडणूक निरीक्षक अरुण कुमार , श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्यधिकारी मच्छिंद्र घोलप, मंडळ अधिकारी प्रशांत ओहोळ, तलाठी हेमंत डहाळे, बीएलओ विपुल गागरे, स्वीप समन्वयक गणेश पिंगळे, निवडणूक शाखा सहायक संदीप पाळंदे यांचे समवेत भेट देऊन कार्यपद्धती समजून घेतली.
अरुण कुमार म्हणाले की, सर्व यंत्रणांनी सतर्कतेने काम करणे गरजेचे आहे. विशेषतः प्रचार सभा, मिरवणुका व कार्यक्रमांवर केल्या जाणाऱ्या खर्चावर निगराणीसाठी असलेल्या पथकांनी अत्यंत बारकाईने नोंदी घेताना व्हिडिओ शुटींग करावी. कुठल्याही पथकाच्या माध्यमातून अथवा चेकपोस्टवर कारवाई करताना, तपासणी तसेच कारवाई करताना निवडणूक आयोगाच्या अपेक्षेप्रमाणे फलनिष्पत्तीवर भर देण्यात यावा. निवडणूकीच्या निमित्ताने होणाऱ्या प्रत्येक अर्थविषयक बाबींवर अत्यंत सुक्ष्मपणे लक्ष पुरविण्याची गरज असल्याचे सांगून भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार वाहनांची तपासणी अधिक दक्षतापूर्वक करावी.
पथकांनी त्यांना नेमून देण्यात आलेल्या जबाबदारीप्रमाणे प्रभावीपणे काम करावे. भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक गोष्टींची नोंद ठेवून सहाय्यक खर्च निरीक्षकांच्या संपर्कात राहावे. मतदारांना प्रभावित करण्यासाठीच्या रोकड, मद्य तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस प्रतिबंध करावा. कारवाईमध्ये सातत्य ठेवावे. तसेच टाकळीभान, शिरसगाव येथील मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील सोयी सुविधेची पाहणी केली.





