श्रीरामपूरची जागा भाजपकडे घेऊन स्थानिक उमेदवार द्या; मिलिंदकुमार साळवे यांची पक्षाकडे मागणी

श्रीरामपूर – आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी श्रीरामपूर मतदारसंघाची जागा भारतीय जनता पक्षाने महायुतीमध्ये स्वतः कडे घ्यावी. तसेच अभ्यासू लोकांमध्ये काम व चांगली, स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या, पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यास उमेदवारी दयावी, अशी मागणी भाजपचे श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे यांनी केली आहे.
भाजप महाविजय २०२४ निवडणूक प्रमुख तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या नवगठीत निवडणूक व्यवस्थापन समितीचे सहसंयोजक आमदार श्रीकांत भारतीय व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन साळवे यांनी ही मागणी केली आहे. शिवसेना व भाजपची युती असल्यापासून युतीमध्ये श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश होऊन युतीची महायुती झाली आहे. महायुतीमध्ये श्रीरामपूर मतदार संघ गेल्या चाळीस वर्षांपासून शिवसेनेकडे आहे.
गेल्या चाळीस वर्षांमध्ये शिवसेनेने श्रीरामपूरची जवळपास प्रत्येक विधानसभा निवडणूक लढवलेली आहे. पण एकाही निवडणुकीत शिवसेनेला विजयश्री मिळविता आलेली नाही. युती तुटल्यानंतर २०१४ मध्ये शिवसेना, भाजप स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढले. यावेळी प्रथमच स्वतंत्रपणे लढलेल्या भाजपने ४५ हजार मतांपर्यंत झेप घेऊन दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. या निवडणुकीनिमित्त पहिल्यांदाच मतदारसंघात भाजपचे कमळ पक्षचिन्ह मतदारांपर्यंत पोहचले.
चाळीस वर्षांत २०१४ चा अपवाद सोडल्यास सातत्याने शिवसेनेने आपला उमेदवार देऊन देखील शिवसेना एकही निवडणूक जिंकलेली नाही. त्यामुळे शिवसेना सतत हरणारी श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाची जागा भाजपने सन २०२४ साठी महायुतीमध्ये स्वतःकडे घेऊन अभ्यासू, निष्ठावान, प्रामाणिक स्थानिक कार्यकर्त्यास उमेदवारी दयावी, अशी मागणी मिलिंदकुमार साळवे यांनी केली आहे. साळवे यांनी स्वतः पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.





