श्रीरामपूर : श्रीरामपूर येथील एमआयडीसी परिसरात श्रीरामपूर पोलिसांनी छापा टाकून सुमारे 13 कोटी 75 लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. छोट्या टेम्पोतून वाहतूक करण्यात येत असलेल्या या अंमली पदार्थाच्या पांढऱ्या रंगाच्या 21 गोण्या पोलिसांनी पकडल्या. याप्रकरणी दोन आरोपींवर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे. दि. 14 मे रोजी 5 वाजेच्या सुमारास उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांना गोपनीय माहिती मिळाली. श्रीरामपूर येथील एमआयडीसी परिसरात एका टेम्पोमधून अंमली पदार्थाची वाहतूक होणार आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. नितीन देशमुख हे तत्काळ पोलीस पथक व पंचासह एमआयडीसी परिसरात पोहचले. एमआयडीसी परिसर व आजूबाजूच्या गावात टेम्पोचा शोध घेतला. यावेळी दिघी-खंडाळा रोडवर एक छोटा हत्ती टेम्पो (एम एच 20 बीटी 0951) असा खंडाळ्याकडून दिघी गावाच्या दिशेने येताना दिसला. वाहनचालक मिनीनाथ राशीनकर (वय 38, रा. धनगरवाडी, ता. राहाता) याच्या टेम्पोची झडती घेतली असता गाडीच्या मागील बाजूस पांढऱ्या रंगाच्या 21 गोण्या दिसून आल्या. त्यापैकी 14 गोण्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आणि उर्वरीत 7 गोण्यामध्ये पांढऱ्या रंगाचे स्फटिक दिसून आले. चालक मिनीनाथ राशीनकर यास विचारपूस केली असता त्याने स्फटिक हे अल्प्राझोलम औषधाचे असून गोण्यांमधील पांढरी पावडर ही अल्प्राझोलम बनविण्याकरीता लागणारा कच्चा माल असल्याचे सांगितले. अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ असल्याने त्याबाबत खात्री करण्याकरीता अहिल्यानगर येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी टेम्पोमधील गोण्यांमधील स्फटिक व पावडर यांचे निरीक्षण करुन स्फटिक हे अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ व पावडर ही अल्प्राझोलम तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल असल्याचे सांगितल्याने मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात 6 कोटी 97 लाख 67 हजार रुपये किमतीच्या 7 गोण्यामध्ये 69.767 कि.ग्रॅ वजनाचे अल्प्राझोलमचे स्फटिक (क्रिस्टल), 6 कोटी 76लाख 74 हजार रु. कि.चे 14 गोण्यामध्ये 338.37 कि. ग्रॅ वजनाचे अल्प्राझोलम बनवण्यासाठीची पावडर, 1 लाखाचा टेम्पो (MH 20 BT 0951) असा एकूण 13 कोटी 75 लाख 41 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीकडे विचारणा करता त्याने सदरचा माल विश्वनाथ कारभारी शिपनकर (रा. दौंड, जि. पुणे) याने दिल्याचे सांगितले. अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ असल्याने व आरोपीच्या ताब्यात तो व्यावसायिक वापराकरिता मोठ्या प्रमाणावर मिळून आल्याने आरोपी मिनीनाथ विष्णू राशीनकर, विश्वनाथ कारभारी शिपणकर यांच्य विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला एनडीपीएस कलम 8 (क), 22(क), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी राशीनकर याला अटक करण्यात आली. पुढील तपास उपअधीक्षक शिवपुजे हे करीत आहेत.