Nitesh Rane : नितेश राणेंना ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य भोवणार; श्रीरामपूरमध्ये गुन्हा दाखल

अहमदनगर : महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने अहमदनगरमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत रविवारी मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाविरोधात प्रक्षोभक भाषण केले. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात अहमदनगर आणि श्रीरामपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता नितेश राणेंच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
सिन्नर येथील प्रवचनात सराला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले होते. त्यावरून मुस्लिम समाजाने त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी मोर्चे काढले होते. त्यानंतर सकल हिंदू समाजाकडून रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात येत आहेत.
रविवारी नगरला रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी नितेश राणे यांनी आक्रमक भाषण करत मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. मी हिंदूंचा गब्बर असल्याचे देखील नितेश राणे यावेळी म्हणाले होते.
श्रीरामपूरमध्ये गुन्हा दाखल
रविवारी मोर्चा संपल्यानंतर रात्रीच्या सुमारास मुस्लिम कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस अधीक्षक कार्यालयात जमा झाले होते. नितेश राणे यांच्याविरूद्ध आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन राणेंविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
त्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. अहमदनगर आणि श्रीरामपूर अशा दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे नितेश राणे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.





