गणवेश, साहित्य वाटपाचा अखेर मार्ग मोकळा

पुणे – महापालिकेच्या शिक्षण विभागातील शाळांमधील सव्वा लाख विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य तसेच गणवेशाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या मुलांना शैक्षणिक साहित्याचे अनुदान डीबीटीद्वारे देण्यात येणार असून त्यासाठीच्या तब्बल 39 कोटी 55 लाख रुपयांच्या खर्चात मान्यता देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच ही रक्कम मुलांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित असताना शिक्षण विभागास पूर्णवेळ अधिकारी नसल्याने हा प्रस्ताव रखडला होता. त्यानंतर, महापालिकेनेच पुढाकार घेत अखेर या साहित्याचे दर निश्चित करून या खर्चास मान्यता दिली आहे. त्यानुसार, पुढील दोन दिवसात ही रक्कम दिली जाणार असल्याचे बिनवडे यांनी स्पष्ट केले.
महापालिकेचे शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर प्रशासकीय कारभार महापालिका आयुक्तांच्या अधिकारीखाली देण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेकडून 2017-18 पासून मुलांचे शैक्षणिक साहित्य खरेदी न करता त्याची रक्कम मुलांच्या बॅंक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे, शिक्षण विभागाकडून नव्याने प्रवेश घेतलेल्या तसेच शाळा सोडून गेलेल्या मुलांची माहिती वगळता इतर मुलांची बॅंकखाती, आधार अपडेट केली आहेत.
मात्र, यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हा अंतर्गत बदल्या तसेच शिक्षण विभागास पूर्णवेळ अधिकारी नसल्याच्या गोंधळाचा फटका डीबीटीच्या नियोजनास बसला होता. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम दैनिक प्रभातने देत याचा सातत्याने महापालिकेकडे पाठपुरावाही केला होता. अखेर प्रशासनाने ही बाब गांर्भीयाने घेत मुलांची यादी आणि खर्च निश्चित केला असून त्यास मान्यता देण्यात आली आहे.
गणवेश, बूट, स्वेटर, दप्तर शालेय साहित्यांचे दर निश्चित केलेले असून त्यानुसार, प्रत्येक वर्गाच्या मुलांसाठीचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार, शिक्षण विभागाने ठेवलेल्या 39 कोटी 55 लाखांच्या खर्चास मान्यता देण्यात आली असून पुढील दोन दिवसात मुलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. – रवींद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त





