खंडाळ्यात महामार्गावर कंटेनर चालकाचा थरार ! अनियंत्रित कंटेनरची सुमारे सात ते आठ वाहनांना धडक

– मोहित देवधर (प्रतिनिधी)
खंडाळा- महामार्गावरील पारगाव- खंडाळा येथील एस कॉर्नर परिसरामध्ये रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये अनियंत्रित कंटेनर चालकाकडून सुमारे सात ते आठ वाहनांना धडक दिल्याने अनेक जण जखमी झाले.व तर वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, पुणे- बंगळुरु महामार्गावरील खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर एस कॉर्नर परिसरामध्ये कंटेनरच्या (आरजे ०९ जीडी २८९८) चालकाचे नियंत्रण सुटले व त्याने समोरील प्रवास करणाऱ्या इतर सात ते आठ वाहनांना जोराची धडक दिली.
या अपघातामध्ये सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर चालकाने वाहन न थांबवता पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, इतर प्रवाशांनी त्याचा पाठलाग करून जुन्या टोल नाक्याजवळ कंटेनर थांबवून चालकाला चांगलाच प्रसाद दिला.
या घटनेची माहिती कळताच खंडाळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी, महामार्ग पोलीस कर्मचारी व शिरवळ रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. वाहतूक सुरळीत करण्यात आली. तसेच सर्व जखमींना वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आले.





