नेवासा शहर, नेवासा फाटा परिसरात धुमाकूळ घालणारे चोरटे लवकरच जेरबंद होणार – पोलीस निरीक्षक धनंजय जाधव

नेवासा – नेवासा शहरातील ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर आणि नेवासा फाटा येथील साईसीटी वसाहतीसमोर चोरट्यांनी चार – पाच दिवसांपूर्वी चोरीच्या केलेल्या अयशस्वी प्रयत्नांची गंभीर दखल नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी घेतली आहे. चोरटे हे सीसीटीव्ही कँमेऱ्यात कैद झाल्यामुळे लवकरच छायाचित्रणाच्या आधारे गजाआड करण्यात येतील, अशी माहीती नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी दैनिक प्रभात’शी संवाद साधताना दिली.
नेवासा शहर व नेवासा फाटा परिसरात गेल्या चार – पाच दिवसांपूर्वी काही हत्यारबंद चोरट्यांनी या परिसरात मोठा धुमाकूळ घालत काही बंगल्यांच्या प्रवेशव्दाराची मोडतोड करुन तसेच काही ठिकाणी चोरट्यांनी थेट काही बंगल्यात आतमध्ये प्रवेश करुन घरातील सामानाची उचकापाचक केल्याची घटना घडलेली होती. त्यामुळे या चोरट्यांकडून चोरीचा प्रयत्न केला गेलेला असला तरी हे चोरटे मात्र सीसीटीव्ही कँमेऱ्यात कैद झाल्यामुळे या छायाचित्रणाच्या आधारे नेवासा पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून या चोरट्यांचा तपास युद्ध पातळीवर तपास सुरु केलेला आहे. चोरटे हे लवकरच जेरबंद केले जातील, असा विश्वासही यावेळी निरिक्षक जाधव यांनी व्यक्त केला.
नेवासा पोलीसांनी या चोरट्यांना लवकरच जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले असून या चोरट्यांचे धागेदोरे नेवासा पोलीसांच्या हाती लागलेले असल्याची माहीतीही जाधव यांनी दिली. नागरीकांनी रात्रीच्या वेळी घरासमोरील विद्युत दिवा चालू ठेवून काही शंका भासल्यास तातडीने नेवासा पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन निरिक्षक धनजंय जाधव यांनी केले आहे.





