प्रहार जनशक्ती पक्षाचे नेवासा फाट्यावर चक्काजाम आंदोलन; शेतकरी आत्महत्यांवरून सरकारवर हल्लाबोल

नेवासा : अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने गुरुवारी (दि. 24 जुलै) सकाळी 10 वाजता सुमारे एक तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागून वाहतूक ठप्प झाली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून आंदोलकांनी हिंदुत्ववादी सरकारवर जोरदार टीका केली.
आंदोलनादरम्यान प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सरकारवर जाती-धर्मात भांडणे लावण्याचा आणि हिंदुत्वाचा ढोंगीपणा दाखवण्याचा आरोप केला. अॅड. पांडुरंग औताडे यांनी, “शासकीय आकडेवारीनुसार दररोज शेतकरी आत्महत्या करत असताना सरकार झोपा काढते का?” असा सवाल उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी दिलेले सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पूर्ण न झाल्याबद्दलही संताप व्यक्त केला. जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब खर्जुले आणि जिल्हाध्यक्ष माऊली सांगळे यांनी, “कर्जमाफी न झाल्यास मंत्रालयात घुसू,” असा इशारा दिला.
आंदोलनात जालिंदर आरगडे, अनिल विधाटे, लक्ष्मण पाटील, विकास कोतकर, अशोक काळे, त्र्यंबक भदगले, अशोक टेमक यांच्यासह अनेक शेतकरी आणि दिव्यांग बांधव सहभागी झाले. आंदोलकांचे निवेदन महसूल अधिकाऱ्यांनी स्वीकारले. नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. प्रहारने मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.





