चऱ्होली खुर्द परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

आळंदी: चऱ्होली खुर्द (ता. खेड) हद्दीतील चांगदेव महाराज विश्रांतीवड जवळील लक्ष्मीनगर, पुण्यभूमी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. दररोज रात्री चोरटे नागरी वस्तीत घुसून चोरीचा प्रयत्न करत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आळंदी पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे. मात्र तरी देखील पोलिसांची व्हॅन परिसरातून जाताच चोरटे सक्रिय होत आहेत.
दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी परिसरातील एक किराणा दुकान फोडून त्यातील काही ऐवज लंपास केला. तसेच, काल रात्री एका बंद घराचे लॉक आणि कडी तोडून चोरीचा प्रयत्न केला गेला. विशेष म्हणजे, चोरटे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असून, चोरीपूर्वी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे रेकी करत असल्याचे उघड झाले आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ड्रोन फिरत असल्याचे दृश्य आढळले आहे. तसेच, एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडाला मास्क लावलेले तीन चोरटे वस्तीत घुसताना दिसले.
या घटनांमुळे घाबरलेल्या नागरिकांनी सजगता दाखवत रात्रीच्या वेळी पहारा देण्यास सुरुवात केली आहे. काल रात्री स्थानिक तरुणांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न हाणून पाडला. सजग तरुणांनी चोरट्यांना पळवून लावले, मात्र तरीही परिसरात दहशतीचे वातावरण कायम आहे. नागरिक आळंदी पोलिसांना गस्त वाढवण्याची आणि कठोर कारवाई करण्याची विनंती करत आहेत.



परिसरातील तरुण रात्री पहारा देत आहेत.



