दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे मोफत वाटप शिबिर नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालयात संपन्न

नेवासा – दिव्यांग नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वावलंबी जीवनाची दिशा देण्यासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी भव्य कृत्रिम अवयव वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी रत्नमाला विठ्ठलराव लंघे-पाटील होत्या.
या उपक्रमाचे आयोजन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद अहमदनगर, जिल्हा रुग्णालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को), कानपूर, व एस. आर. ट्रस्ट, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
शिबिरात नेवासा तालुक्यातील विविध गावांतील अस्थिव्यंग लाभार्थ्यांना कृत्रिम हात, पाय व कॅलिपर्स यांचे मोजमाप घेऊन तात्काळ मोफत वितरण करण्यात आले. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवला.
या उपक्रमाचे उद्घाटन आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नमालाताई लंघे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्या तेजश्री लंघे, प्रताप चिंधे, मार्केट कमिटी संचालक शंकरराव लोखंडे, युवा नेते ऋषिकेश शेटे, मनोज पारखे, भाजपा महिला आघाडीच्या अमृताताई नळकांडे, मनीषाताई वाघ, भारतीताई बेंद्रे, शिवसेना महिला आघाडीच्या शोभा आलवणे, भारती कर्डक, तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. काटे, आरोग्य अधिकारी डॉ. दीपक डिंबर, डॉ. मोहसिन बागवान, डॉ. अविनाश काळे, हरिभाऊ जगताप, बाळासाहेब पिसाळ, सतीश शिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमातून दिव्यांग बांधवांना नवजीवनाची उमेद मिळाली असून, त्यांना खऱ्या अर्थाने आधार देणारे आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांचे दिव्यांग बांधवांकडून विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या प्रयत्नांनी दिव्यांगांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आत्मविश्वासाचा झळाळा पाहायला मिळाला. या उपक्रमामुळे नेवासा परिसरात सामाजिक संवेदनशीलतेचा आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेचा सकारात्मक संदेश गेला आहे.





