शेळ्या-बोकडांचा ‘चोर बाजार’ उद्ध्वस्त! दोघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Pune Gramin News | इंदापूर, वालचंदनगर व यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शेळ्या व बोकड चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी आरोपींनी तब्बल ८ लाख ५० हजार रुपये किमतीचे शेळ्या व बोकड चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. पोलिसांना दोघांना पकडण्यात यश आले असून तिघेजण पळू जाण्यात यशस्वी झाले आहेत. स्थनिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
रोहित दत्तात्रेय कटाळे (वय -20, रा. तुपेवस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली), साहिल विलास चौधरी (वय – 20, रा. बोचेवरती, उरुळी कांचन), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वैभव ऊर्फ गोट्या तरंगे (रा. दत्तवाडी, उरुळी कांचन), सचिन अरुण कांबळे (रा. तळवाडी चौक सिद्धिविनायक हॉस्पिटल मागे, उरुळी कांचन) व खंडू महाजन (रा. वडापुरी, ता. इंदापूर) अशी फरार असलेल्या तिघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर व वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शेळ्या व बोकड चोरी गेल्याच्या घटनेत वाढ होत होती. त्या अनुषंगाने वरिष्ठाकंडून स्थानिक गुन्हे शाखेला चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी विविध भागात गस्त घालण्यास सुरुवात केली होती. पोलिसांना वालचंदनगर व इंदापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळीने आंबळे रेल्वे स्टेशन येथून कॉपर वायर चोरुन आणलेल्या आहेत, ते वरकुटे (ता. इंदापूर) गावाचे हद्दीत तलावाच्या जवळ वायर जाळत बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यावेळी पाच इसम काही तरी जाळत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच सर्वजण पळून जाऊ लागले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांचा पाठलाग करून रोहित कटाळे याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार साहिल चौधरी, वैभव ऊर्फ गोट्या तरंगे, सचिन अरुण कांबळे व खंडू महाजन या सर्वांनी मिळून शेळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींवर इंदापूर, वालचंदनगर व यवत पोलिस ठाण्यात विविध 11 गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, दत्ताजी मोहिते, तसेच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, सहायक फौजदार बाळासाहेब कारंडे, पोलीस हवालदार स्वप्नील अहिवळे, अभिजीत एकशिंगे, निलेश शिंदे, राजु मोमीन, अतुल ढेरे, योगेश नागरगोजे, अमोल शेंडगे यांनी केली.





