Police Suspended : गुन्ह्यामध्ये अडकविण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचे प्रकार पुणे शहर पोलीस दलात समोर येत असताना यावर पोलीस आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला असून आयटी क्षेत्रातील तरुण-तरुणीला सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देत त्यांच्याकडून युपीआयच्या माध्यमातून पैसे उकळल्याने वाघोली पोलीस स्टेशनच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याप्रकारामुळे वाघोली पोलिसांची प्रतिमा डागाळली गेली आहे. पोलीस हवालदार किरण अब्दागिरे, पोलीस शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. नेमके प्रकरण काय? याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तीनही पोलीस कर्मचारी वाघोली पोलीस स्टेशनला कार्यरत होते. २ एप्रिल रोजी रात्री खाडे व कांबळे गस्तीवर असताना त्यांना एका सोसायटीत काही तरुण मुलींसोबत व्हिडिओ शूट सुरू असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्याची शहानिशा करण्यासाठी ते गेले. परिस्थितीचा गैरफायदा घेत संबंधित २४ वर्षीय तरुणाला पोलीस ठाण्यात आणले. यावेळी अब्दागीरे पोलीस ठाण्यात होते. त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली. एवढेच नाही, तर सेक्स रॅकेटमध्ये अडकवून त्याची नोकरी जाण्याची, नातेवाईकांना बोलाविण्याची भीती दाखवली गेली. या दरम्यान तरुणाला मारहाण करण्यात आली, तसेच मानसिक दबाव टाकून त्याच्याकडून १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर तरुणीला ताटकळत ठेवले. अखेर ‘ओंकार ऑटो गॅरेज’ नावाचा स्कॅनर दाखवून युपीआयच्या पेच्या माध्यमातून पैसे उकळण्यात आले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तरुणाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन घटनेची माहिती दिली. पोलीस उपायुक्तांनी घटनेची चौकशी केली. त्यानंतर कारवाईचा करण्यात आली आहे. गुन्ह्यांचा चढता आलेख असलेल्या वाघोली पोलीस स्टेशनमध्ये होणाऱ्या गैरवर्तन, अयोग्य वागणुकीबाबत नागरिकांमध्ये सतत चर्चा होत असते. न्याय मिळत नसल्याने अनेक प्रकरणांमध्ये तक्रारदाराला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागत असते. यापूर्वी देखील पोलिसांच्या वागणुकीमुळे वाघोली पोलीस स्टेशन चर्चेत राहिले आहे. अशातच धमकावून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आल्याने परिस्थिती अधिकच गंभीर असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांच्या मनात पोलीसांप्रती आदराची भावना निर्माण होण्यासाठी फिर्यादीला नम्रपणे वागणूक देणे, कोणतीही टाळाटाळ न करता एफआयआर किंवा अर्ज स्वीकारणे, धमकावणे, दबाव टाकणे किंवा अपमानास्पद भाषा वापरणे टाळावे, प्रत्यक्षात वर्तनात बदल करणे, कारवाईची माहिती फिर्यादीला स्पष्टपणे देणे, महिला व संवेदनशील प्रकरणांमध्ये विशेष काळजी, गोपनीयता आणि कायदेशीर नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.