Police Constable Missing Case : मुलीच्या वाढदिवशी स्वतःचीच श्रद्धांजली पोस्ट करून पोलीस कर्मचारी बेपत्ता; वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

यवत : पुणे जिल्ह्यातील दौंड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यवत पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांने आपल्या व्हाट्सअपवर स्टेटस ठेऊन अचानक बेपत्ता झाला आहे. बेपत्ता होण्यापूर्वी त्याने व्हाट्सअप वर आपले स्वतःचा आणि मुलीचा फोटो ठेऊन त्याखाली दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा असं लिहून आपला फोन बंद केला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. निखिल रणदिवे यांचा अद्यापही फोन बंद असल्याने त्यांच्या कुटुंबांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
निखिल रणदिवे यांची मुलींसाठी भावनिक पोस्ट
बेपत्ता होण्यापूर्वी निखिल रणदिवे यांने व्हाट्सअपवर आपला स्वतःचा फोटो ठेऊन “भावपूर्ण श्रद्धांजली” आणि दुसऱ्या फोटोत स्वतःच्या मुलीचा फोटो ठेऊन त्याखाली “माझी प्रिय दिदी..आज तुझा पहिला वाढदिवस..पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता. पण मी पोलीस नोकरी करतो. तिथ वरिष्टांची मनमानी चालते, तसेच चार पाच दिवसापूर्वी तु आजारी होती. पण मला मुद्दाम नाशिक, जळगाव, अहिल्यानगर येथे कर्तव्य नेमल्यामुळे तुला हॉस्पीटलमध्ये घेवुन जाता आले नाही, असं लिहिले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप
तसेच यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेली ०१ वर्षापासुन सतत त्रास देत आहे. माझा नाईविलाज आहे, मी माझे जिवाचे बरेवाईट करुन घेत आहे, दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा.. असं लिहीत आपला फोन बंद केला आहे. यामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
मुलीच्या वाढदिवशीच टाकलेली पोस्ट..
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रणदिवे यांची बदली यवत पोलीस ठाण्यातून शिक्रापूर पोलीस ठाण्यात झाली होती. मात्र यवत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हे रणदिवे यांना या ठिकाणाहून शिक्रापूर येथे हजर होणेबाबत रवाना करत नसल्याची चर्चा पोलीस वर्तुळात व त्यांनी लिहलेल्या सुसाईड नोट्स मध्ये आहे.
रणदिवे यांना एक मुलगा व एक वर्षांची मुलगी असून आज तिचा वाढदिवस होता. मात्र, मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी टाकलेली पोस्ट ही अत्यंत धक्कादायक आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्यावर वरिष्ठ अधिकारी यांनी गेली वर्षभरापासून त्रास देत असल्याचे गंभीर आरोप देखील केले आहेत.
दरम्यान, यवत पोलीस प्रशासन रणदिवे यांचा सर्वत्र शोध घेत असून त्यांचा अद्यापही तपास लागला नाही. त्यामुळे यवत पोलीस ठाण्यात चाललंय तरी काय? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकरणात यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी निखिल रणदिवे यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत.





