शिरूर : दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा गळा आवळून खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पाण्यात टाकणाऱ्या आरोपीस शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने केवळ १२ तासांच्या आत परजिल्ह्यातून बेड्या ठोकत उल्लेखनीय कारवाई केली आहे. या प्रकरणाने शिरूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. २७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजता शिरूर येथील पांजरपोळ परिसरातील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात अशोक तात्या खंडागळे (वय ३१, रा. बोराडेमळा, शिरूर) याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. पोस्टमार्टम अहवालात मात्र मृत्यू हा पाण्यात बुडून नव्हे तर गळा दाबून झाल्याचे नमूद करण्यात आल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. तपासादरम्यान मिळालेल्या साक्षीदारांच्या जबाबांवरून व सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणातून असे समोर आले की, मृत अशोक खंडागळे यास त्याचा मित्र आकाश ज्ञानेश्वर लोहार (रा. शिरूर) व त्याचा एक साथीदार यांनी २५ सप्टेंबर रोजी श्रद्धा बार, शिरूर येथे दारू पिण्यासाठी बोलावले होते. दारू पिताना दोघांत वाद झाला आणि रागाच्या भरात आकाश व त्याच्या मित्राने अशोकचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पाण्याच्या खड्ड्यात फेकून दोघे पसार झाले. या घटनेनंतर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पथके तयार करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, दिलीप पवार, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर, तसेच पोलीस अंमलदार सचिन भोई, विजय शिंदे, नितेश थोरात, निखील रावडे, निरज पिसाळ, अंबादास थोरे, अजय पाटील यांनी आरोपींच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीच्या आधारे पोलीसांनी सापळा रचून मुख्य आरोपी आकाश ज्ञानेश्वर लोहार (वय २५) यास कौठाळी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथून अटक केली, तर त्याचा साथीदार हा विधीसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली, दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून खून झाल्याचे सांगितले. आकाश लोहार यास न्यायालयात हजर केले असता १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली असून विधीसंघर्षित बालकास बालन्याय मंडळ, येरवडा (पुणे) समोर हजर करण्यात आले आहे. या प्रकरणातील वेगवान आणि अचूक तपासासाठी पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखालील शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिरूर पोलिसांची ही धडाकेबाज कामगिरी पुन्हा एकदा दाखवते की गुन्हा काहीही असो, पोलिसांच्या दक्ष तपासापासून कोणताही गुन्हेगार सुटू शकत नाही.