ShivSena News: सहा बंडखोर खासदारांच्या गटाला ठाकरे गटाकडून आक्षेप; अन् अखेर निर्णय झालाच…
ShivSena News: एकनाथ शिंदे यांची लोकसभेमधील ताकद वाढली

ShivSena News: शिवसेना ठाकरे गटातून सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी ठाकरे गटाने आक्षेप घेत बंडखोरांच्या गटाला मान्यता देवू नये, अशी मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केलीहोती. तसेच पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार या सर्वांना अपात्र करण्यात यावं अशी मागणी ही करण्यात आली होती. मात्र ठाकरे गटाने केलेल्या मागणीच्या पूर्ण विरुद्ध निर्णय घेण्यात आला आहे.
सहा खासदारांच्या विलीनीकरणाला मान्यता
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उद्धवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदेसेनेत सहभागी झालेल्या सहा खासदारांच्या विलीनीकरणाला मान्यता दिली आहे. त्याबाबतचे पत्र लोकसभा सचिवालयाने जारी केले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, नागेश आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे हे आता शिंदेसेनेचे खासदार बनले आहेत. सुमारे महिनाभरापूर्वी या खासदारांनी बंडखोरी करत शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंदर्भात लोकसभा कार्यालयाकडे पत्रव्यवहारही झाला होता. आता त्याला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली.
श्रीकांत शिंदे यांची या गटाचे नेते
लोकसभा सचिवालयाने शनिवारी अधिकृत परिपत्रक जारी करून १८ व्या लोकसभेतील पक्षांच्या बदललेल्या स्थितीची माहिती दिली. या मंजुरीनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांची या गटाचे नेते म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे निश्चित एकनाथ शिंदे यांची लोकसभेमधील ताकद अधिक वाढली आहे. या विलीनीकरणामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संख्याबळ आता ७ वरून १३ खासदारांवर पोहोचले आहे. तर उद्धवसेनेकडे आता लोकसभेत केवळ ३ खासदार शिल्लक राहिले आहेत.
आता एनडीएमध्ये शिंदेची शिवसेना तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनला आहे. १३ खासदारांसह एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) तेलगू देसम पार्टीच्या १६ खासदारांनंतर दुसरी सर्वात मोठी मित्रपक्ष बनली आहे. दरम्यान, या निर्णयानंतर आता ठाकरे गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ShivSena News
हेही वाचा:






