Nana Patole : जनतेच्या या मागणीची सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी – नाना पटोले

मुंबई : मतदानासाठी मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी जनतेतून वाढत आहे. त्या मागणीची दखल सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने घ्यावी, अशी भूमिका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी मांडली. राज्यातील विधानसभा निवडणूक निकालाविषयी महाविकास आघाडीकडून साशंकता व्यक्त केली जात आहे. त्या निकालात जनभावनेचे प्रतिबिंब उमटत नसल्याचे आघाडीचे म्हणणे आहे.
अशात मारकडवाडीतील ग्रामस्थांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर (इव्हीएम) आक्षेप घेतल्याचा विषय गाजत आहे. त्या पार्श्वभूमीवर, पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी नवे सरकार जनतेच्या मनातले आणि मतातले नसल्याचे म्हटले. विषय एकट्या मारकडवाडीचाच नाही. प्रत्येक गावात त्याविषयी चर्चा आहे. हे सरकार कसे आले असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
त्यावरून अनेक गावांमध्ये ग्रामसभांची प्रक्रिया सुरू झाली आहे, असा दावा त्यांनी केला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवून महायुतीने सत्ता राखली. निवडणुकीआधी सत्ताधाऱ्यांना महाविकास आघाडी कॉंटे की टक्कर देईल असे अंदाज वर्तवले जात होते. प्रत्यक्षात आघाडीच्या पदरी नामुष्कीजनक अपयश पडले.





