nagar | आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक

पारनेर, (प्रतिनिधी) – भारतीय लोकशाही ही जगातील एक आदर्श लोकशाही प्रणाली म्हणून ओळखली जाते. ही लोकशाही प्रणाली दिवसेंदिवस बहरतच चाललेली आहे. भारतीय लोकशाही प्रणालीत निवडणूक ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया असून याचे ज्ञान विद्यार्थ्यांना शालेय जीवनातूनच मिळावे म्हणून प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरी येथील विद्यार्थ्यांचे वर्ग मंत्रिमंडळ निवडणूक घेऊनच तयार केले गेले.
इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेतून आपले वर्ग प्रतिनिधी निवडता येता. यामध्ये उमेदवारी अर्ज भरणे, त्यासोबत पाच रुपये अनामत रक्कम देणे, सूचक व अनुमोदक यांच्या सह्या घेणे, अर्ज माघारीनंतर राहिलेल्या उमेदवारांची मतपत्रिका तयार करणे.
त्यासाठी पेन, पुस्तक, पॅड, पृथ्वी गोल हे शैक्षणिक साहित्याचे चिन्ह म्हणून वापर करणे अशा प्रकारे ही प्रक्रिया केली गेली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी त्यांच्या बोटांना शाई लावण्यात आली. यावेळी प्रत्यक्ष मतदानासाठी खोड रबरपासून बनविलेल्या रबरी फुलीचा शिक्का तयार करून प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली.
मतदानानंतर वर्गातील विद्यार्थ्यांसमोरच मतमोजणी घेण्यात आली. काही वर्गात उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी टाकून विजयी उमेदवार घोषित करण्यात आले. या प्रक्रियेमध्ये सर्वच वर्गातील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.





