पुणे : विद्यापीठ व महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा दि. १५ जून रोजी होत आहे. या परीक्षेबाबत समाजमाध्यमांवर काही खोटी माहिती प्रसारित केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या सेट विभागाकडून समाजमाध्यमांत खोटी बातमी पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात पुण्यातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली असून, प्रश्नपत्रिका मिळण्याबाबतचा व्हिडीओ समाजमाध्यमात फिरत असल्याचा प्रकार एका युट्यूब वाहिनीद्वारे निदर्शनास आला. त्यामुळे सेट परीक्षेबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकाराची दखल घेत विद्यापीठाच्या सेट विभागाने बुधवारी रात्री सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल आहे. विद्यापीठातील सेट परीक्षा विभागातर्फे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेतली जाते. येत्या १५ जून रोजी ४० वी सेट परीक्षा १८ शहरांमधील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी सुमारे १ लाख १० हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या वृत्तात काहीही तथ्य नसून, अशा व्हिडीओवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.